
वडगाव मावळ:
वडगाव नगरपंचायतच्या वतीने पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली असून शहरातील वाहणाऱ्या मोठ्या मुख्य नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे.
दरवर्षी नाल्यांमधील गाळ काढणे तसेच झाडांच्या तुटलेल्या फांद्या काढण्याचे काम प्राधान्यक्रमाने करावे लागते. यावर्षी तौक्ते चक्रीवादळामुळे वडगाव परिसरात अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने साधारणतः मान्सूनच्या महिनाभर आधीच थोड्याफार प्रमाणात पावसास सुरूवात झाली असल्याने त्यापूर्वीच नगरपंचायत प्रशासनाकडून नाले साफ सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे.
सफाई कर्मचारी व ठेकेदारी कामगारांचे माध्यमातून नाले सफाईचे तसेच गटारे साफ करण्याचे, त्यामध्ये आलेले गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी विद्युत महावितरण मंडळाला पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त झालेल्या विद्युत वाहिनी तसेच विद्युत वाहिनीवर आलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या हटवण्याचे लेखी निवेदन दिल्याने दोन दिवसांपासून वीज वितरण मंडळाच्या वतीने या कामांस सुरूवात केली आहे.

