
जुन्नर:
शेतीशी नाळ जोडलेली असली की,पायही जमिनीवर घट्ट रोवतात.त्यातूनच समृद्ध शेती पिकते बहरते. आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सुखाचे चार दिवस येतात.शेतीतून माणिक मोती पिकवण्यापूर्वी बळीराजाच्या घामाच्या धारांनी शिवार भिजते. या शिवारात मशागतीला बळिराजा सोबत असते,त्याची सर्जाराजीची जोडी.
या जोडीच्या मानेवर जोखड ठेवून, हाळ दिली की वृषभराजाची भर भर पाऊल काळ्या आईची फाळाने मशागत करतो. या मशागतीची ही हाक शिवारात गुंजून उठली की,तिचा प्रतिध्वनी आभाळातील काळ्या ढगाला साद घालून बरसण्याची विनवणी करतो. काहीसे हे चित्र पुणे जिल्ह्यातील शिवारात पाहयला मिळते. अशीच बळीराजाची साद पाहून तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले आमदार अतूल बेनके यांना औत हाकण्याचा मोह आवरला नाही,त्यांनी वावरात नांगरणी केली.
राजकारणात समाजकारणात कितीही उंची गाठली तरी पाय जमीनीवर ठेवून मातीशी असलेली आपली नाळ त्यांनी अधोरेखित केली.
तालुक्यातील आदिवासी भागातील कोपरे मांडवे या भागातील दौऱ्या दरम्यान एक शेतकरी बांधव शेतात औत हाकताना दिसला आणि ते पाहून आमदार अतूल बेनके यांच्या वाहनाचा ताफा तेथे थांबला,आमदार साहेबांनी बैलाचा कासरा हाती घेतला,एका हाताने नांगराची मुठ हाती धरली,आणि आरोळी ठोकून नांगरणी केली. त्या शेतकऱ्यासोबत त्यांनी नांगर धरण्याचा अनुभव व आनंद घेतला.
ना.वल्लभशेठ बेनके साहेबांनाही शेती विषयी प्रचंड आवड आहे. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात नवीन पिढीला नांगर धरणे व औत हाकणे या गोष्टींची कल्पना नाहीये. आधुनिकीकरण करत असताना.नवीन पिढीने खेडापाड्यातील हि आपली कृषी संस्कृती देखील
अनुभवली पाहिजे व जपली देखील पाहिजे .
आमदार अतुल बेनके म्हणाले,” कृषी संस्कृती आणि आपलं नातं हे अतूट आहे. आपली समृद्ध अशी कृषी संस्कृती जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गाव शिवार सुजलाम सुफलाम करणे हेच ध्येय समोर ठेवून आपण वाटचाल करत आहोत.

