
वडगाव मावळ:
पिंपळोली आणि ताजे या गावातील 350 कुटुंबाना डॉ अनिल बनसोडे यांच्या विश्वानंद आयुर्वेदिक क्लिनिक हडपसर आणि आय आर बी कंपनीच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारशक्ती वर्धक काढ्याचे 350 पॅकेट चे वाटप करण्यात आले.
आय आर बी कंपनीचे सरव्यवस्थापक रवींद्र वायाळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याचे गावच्या महिला सरपंच सुतार यांनी सांगितले. गावामध्ये मागील पंधरा दिवसात कोरोनामुळे तीन मृत्यू झाले, असल्याने गावातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
श्री रवींद्र वायाळ आणि डॉ कोरपडे यांनी गावातील सरपंच सुतार, पिंपळोलीचे पोलीस पाटील बोंबले , ताजे गावाचे पोलीस पाटील अरुण केदारी, प्रा माणकु बोंबले आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिंपळे यांना मार्गदर्शन करून यांच्या मनातील भीती मिटवली. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसीग, सॅनिटायझर च्या वापराबरोबर आहार,पथ्य, व्यायाम आणि प्रतिकारशक्ती वर्धक कण्ठवर्धक काढा याची माहिती दिली.
या काढ्यात 26 आयुर्वेदिक घटक द्रव्ये असून ज्यामुळे मनुष्याची प्रतिकारशक्ती चांगली राहते. या काढ्याची किंमत सुमारे 700 असून 3 लक्ष किमतीचा हा काढा मोफत देण्यात आला.
यावेळी प्राध्यापक माणकु बोंबले,” म्हणाले कोरोना काळात ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वर्धक काढ्याबरोबर मानसिक आधार गरजेचा आहे जो आज आम्हाला मिळाला. तालुक्यातील स्थानिक गावातील दानशूरांनी स्थानिक लोकांना मदत करण्यास पुढे येणे गरजेचे आहे असे बाळासाहेब पिंपळे यांनी सांगितले. गावातील स्थानिक आय आर बी प्रतिनिधी लक्ष्मण पिंपळे , सरपंच सुतार यांनी घरटी जाऊन आयुर्वेदिक काढ्याचे वाटप केले.

