वडगाव मावळ:
खडू डस्टर घेऊन वर्गातील मुलांना शिकवायचे हे त्यांचे स्वप्न.शाळेच्या चार भिंतीत विद्यार्थ्यांना संस्कारांच्या चार गोष्टी सांगायच्या ही आवड.यासाठी शिक्षण क्षेत्रातील पदवी घेतली . डी.एडची पदवी घेतली.पण शिक्षक भरती झालीच नाही.त्यामुळे शाळेत शिक्षिका म्हणून मिरवण्याच्या स्वप्नाला छेद बसला. मग पुढे कुटुंबियांच्या स्वप्नांसाठी नवऱ्याच्या पुढाकाराने शासनाने घेतलेल्या पोलीस पाटीलकीची परिक्षा तिने दिली. आणि त्या गावच्या पोलीस पाटील झाल्या.
आता,त्या  गावच्या सुखात ,दुःखात,संकटात,अडीअडचणीत धावून आपल कर्तव्य पार पाडीत आहे.
पाटीलकीचा दरारा चांगलाच वाढला आहे,तो लोक सेवेसाठी. सतत गावच्या हितासाठी झटणा-या पिंपळोलीतील दिपाली मानकू बोंबले असे शिक्षिकेचे स्वप्न पाहणा-या पण आता  पाटलीण झालेल्या मॅडमचे नाव.
दिपाली यांचे माहेर देहू जवळचे येलवाडी.  संजीवनी मधुकर गाडे आणि मधुकर पंढरीनाथ गाडे यांची ही लाडकी लेक.लेकीचे  शिक्षण आजोळी मांजरेवाडीत झाले. महाविद्यालयीन शिक्षण राजगुरुनगरात आणि डीएडची पदवी नेरूळला वसतीगृहात राहून झाले.ज्ञानदानाच्या या पवित्र कार्याची तिला आवड होती,आजही ती आवड तशीच आहे. सावित्रीबाई फुलेचा वसा आणि वारसा जागोजागी लावणा-या सावित्रीच्या लेकी कशातच मागे नाही,हे आज आपण पावलोपावली पाहतो. 
स्त्री शक्तीचा हा जागार आपण कायमच अनुभवतो. स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख अशाच पुढे वाढत राहणार आहे,हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.त्याचा प्रत्ययही आपल्याला कायम येतो.मग त्याला दिपाली बाई अपवाद कशा असतील. मास्तरीण म्हणून मिरवू शकले नसले तरी पोलीस पाटीलीण ही उपाधी काही कमी नाही,शेवटी काम तर समाजाचेच करायचे. त्याही कामात त्या सक्रीय राहू लागल्या. त्यातच अजून एक वेगळेपण म्हणजेच सासरी असलेला राजकीय वारसा.
त्यांचे  सासरे विष्णू मानकू बोंबले हे ताजे पिंपळोली आणि पाथरगाव या तीन गावची ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच होते. तर सासू नकूबाई विष्णू बोंबले या घराचे घरपण जपणा-या आदर्श गृहिणी.गावकारभाराच्या सोबत प्रपंचही नेटका आणि उत्तम करता आला पाहिजे याचे औपचारिक शिक्षण त्या माहेरी घेऊन आल्याच होत्या. सासरी त्यात आणखी भर पडली आणि दिपाली बाई यांचा लेक,सून,पत्नी,आई,पोलीस पाटील असा प्रवास सुरू झाला.
 कोणतेही पद हे काटेरी मुकुट आहे,त्या पदाला न्याय दिला तर त्या पदाची उंची वाढते.
त्याचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढते. लोकप्रतिनिधींनी केलेली सूचना मार्गी लावलेले एखादे काम कित्येक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरते. काम छोटे असो की मोठे त्या कामानी समाजाचेच हित साधता येते हा विचार सकारात्मकता वाढवतो असा त्याचा विश्वास आहे. म्हणून काळाच्या बरोबर आपणही चालल पाहिजे यासाठी त्या सतत आपल्या कामात व्यस्त आहेत. सायबर क्राईम खेडोपाडी पोहचला आहे,सायबर क्राईम म्हणजे काय,वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कामशेत पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांनी पिंपळोली गावातील तरूण – तरूणीसाठी सायबर गप्पांचे आयोजन केले होते,त्यातून सायबर क्राईमची माहिती दिली आहे.
गावातील महिलांना कायद्याची माहिती करून देण्यासाठी महिला जनजागृती शिबीर आयोजित केले होते. गावातील भावबंदकीतील जमिनीचे वाद गावातील ज्येष्ठ पंचमंडळीच्या साहाय्याने चर्चेद्वारे मिटविले.निसर्ग चक्रीवादळामुळे गावात प्रचंड नुकसान झाले या नुकसानग्रस्तांसाठी सुमारे ४५ लाखाची शासकीय मदत मिळवून दिली. आमदारसाहेबांकडे पाठपुरावा करून काहींना पत्रे तर काहींना अन्नधान्याची किट मिळवून दिली.चक्रीवादळामुळे गावात ४५ दिवस वीज नव्हती तेव्हा काॅम्पिटेटर फाऊंडेशनच्या माध्यमातून २०० पॅकेट मेणबत्त्यांचे वाटप केले.
माननीय आमदारसाहेबांकडे पाठपुरावा करून अंदाजे २५ लाख किमंतीची नवीन वीजपुरवठा करणाऱ्या लाईनचे काम केले.सुरवातीच्या करोना काळात लाॅकडाऊनमध्ये गरीब कुटुंबाना स्वखर्चाने अन्नधान्याचे वाटप केले.अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुबियांना शासनाकडून २ लाखाची मदत मिळवून दिली. कोरोना काळात गरीब गरजूंना अन्नधान्य किट वाटप केले,स्थलांतरीत लोकांची सोय केली व माझे कुंटुंब, माझी जबाबदारी अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेस साह्य केले. 
गावात शांतता राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल ,अवैध धंदे रोखण्यासाठी महिला दारूबंदी समिती, गावात माहिती प्रसारित आपत्ती, चोरी व इतर माहिती देण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली.या ना अशा अनेक उपक्रमांसाठी सतत झटणा-या दिपाली ताई यांची समाजातील उपेक्षित घटकांच्या विषयी असलेला कणवळा निश्चितच उल्लेखनीय आहे. (शब्दांकन- सौ.अर्चना रामदास वाडेकर)

error: Content is protected !!