महाराष्ट्रासह मावळच्या भूमिपुत्रांचा रोजगार हिरावून नेला
राष्ट्रवादी आक्रमक
वडगाव मावळ येथे गुरूवारी निषेध मोर्चा
वडगाव मावळ:
वेदांता ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होता.परंतु आता हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रासह मावळातील लाखो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने केले आहे.
महाराष्ट्र,तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती.परंतु कंपनीने महाराष्ट्राला पसंती देखील दिली होती.पण अचानक हा प्रकल्प गुजरात मध्ये कसा काय गेला ? हा प्रश्न घणाघात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” महाविकासआघाडी सरकारच्या काळात कंपनीच्या शिष्टमंडळा सोबत तीन वेळा बैठका झाल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारकडून वेदांता ग्रुपच्या अटी-शर्ती व सवलती मान्य करण्याबाबत चर्चाही झाली होती.वेदांताच्या वरिष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करून मावळ तालुक्यातील आंबळे एमआयडीसी हेच ठिकाण योग्य असल्याचे कंपनीला सुचविले होते. आंबळे एमआयडीसी मधील सुमारे अकराशे एकर जागेची निश्चिती देखील करण्यात आली होती. या भागात उपलब्ध होणारे कुशल मनुष्यबळ, पुरवठा साखळी अशा जमेच्या बाजू होत्या.
   याशिवाय पुणे-मुंबई शहरे जवळ असल्याने त्याचा फायदा देखील कंपनीला झाला असता.या प्रकल्पामुळे मावळची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण झाली असती. तसेच या प्रकल्पामुळे सुमारे दोन लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.असे बैठकीतील सादरीकरण वेळी सांगण्यात आले होते.
चाकण-तळेगाव एमआयडीसी मध्ये अनेक प्रकल्प आजपर्यंत आले. त्यात जेवढी गुंतवणूक,रोजगारनिर्मिती झाली असेल. तेवढी गुंतवणूक व रोजगार निर्मिती ही या एकाच प्रकल्पातून झाली असती.एवढा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे मावळातील एखादा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यास हे सरकार कारणीभूत ठरले,ही गोष्ट मावळची सुज्ञ जनता कधीही विसरणार नाही,याची नोंद शिंदे सरकारने घ्यावी असे आवाहन  आमदार शेळके यांनी दिले.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” मावळ तालुक्यातील होत असलेल्या वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेला आहे, या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
सुमारे एक लाख  इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. गुजरातच्या निवडणूक तोंडावर आली असल्याने महाराष्ट्र भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. मावळ तालुक्यातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का ? असा आमचा प्रश्न आहे.
या निर्णयाच्या विरोधात शासनाचा धिक्कार करीत निघणा-या या निषेध मोर्चात आपण सहभागी व्हावे. गुरूवार दिनांक १५.०९.२०२२ रोजी  दुपारी १  वाजता ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिर प्रांगण, वडगाव मावळ पासून मोर्चाला  सुरुवात होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते न नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे.

error: Content is protected !!