तळेगाव दाभाडे:
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासा सोबत त्यांच्या करिअरची जबाबदारी घेऊन आमची शैक्षणिक वाटचाल अविरतपणे सुरू असल्याचा विश्वास मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला.
सी.बी.एस.ई बोर्ड असलेल्या मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ’ व नवीन ग्रंथालय, रोबोटिक प्रयोगशाळा या कक्षांच्या उद्घाटन प्रसंगी खांडगे बोलत होते.
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ‘इ. १०वीबोर्ड (सी.बी.एस.ई) गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ’ व ग्रंथालय, रोबोटिक प्रयोगशाळा या कक्षांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम’ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल तुपे, सन्मित्र बॅकेचे अध्यक्ष सुनील गायकवाड,शाळेचे उपाध्यक्ष अविनाश पाटील, नू.म.वि.प्रचे सहसचिव नंदकुमार शेलार,  नू.म.वि.प्रचे संचालक सोनबा गोपाळे , सुहास गरूड, राज खांडभोर शिक्षक व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर शाळेने नव्याने सुरु केलेल्या प्रशस्त व अद्यावत अशा रोबोटिक प्रयोगशाळा व ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील विविध प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, नैसर्गिक खत निर्मिती, सिवेज ट्रीटमेंट प्रकल्प यांचे उद्घाटन करण्यात आले. याचे प्रतीक म्हणून‘ MaksSchool, Green School Board’ चे अनावरण करण्यात आले.
‘इ. १०वीबोर्ड (सी.बी.एस.ई) गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सलग चौथ्यावर्षीही विद्यार्थ्यांनी १०० % निकालाची परंपरा राखत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला आहे. इतर प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कु.सई आवटी ह्या विद्यार्थिनीने शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी संस्था सुरु करण्याचा उद्देश व ती कशी नावारूपाला आली तसेच संस्थेच्या विस्ताराची माहिती दिली.  विद्यार्थ्यांची शाळेत प्रवेश घेतल्यानंतर ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय या संस्थेमध्ये आहे याची माहिती दिली.
साधना सहकारी बॅकचे अध्यक्ष अनिल तुपे यांनी शालेय जीवनातील शिक्षकांचे महत्त्व अधोरेखीत केले.तसेच विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालक अशोक ढोबारे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेने माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. १०वी च्या विद्यार्थिनीं कु.सई पाटील व कु. श्रावणी चोरमाळे ह्यांनी केले. सोनबा गोपाळे गुरुजी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!