वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील सुरू असलेल्या विकासकामांना स्थगिती देऊन पुरवणी मागणीत एकही रुपयाची तरतूद राज्य सरकारने केली नसल्याने आमदार सुनील शेळके यांनी आज पुन्हा अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊन हवं तर भाजपचे बोर्ड लावतो, पण विकासकामे थांबवू नका अशी विनंतीच राज्य सरकारला केले.
राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या पुरवणी बजेटमध्ये मावळ तालुक्यातील विकासकामांसाठी एकही रुपयाची तरतूद केली नाही, तसेच विकास कामांना स्थगिती दिली. त्यामुळे आमदार शेळके हे चांगलेच आक्रमक झाले. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेलेच पैसे द्या, तुमचा एकही रुपया नको, हवं तर भाजपचे व शिंदे गटाचे बोर्ड लावतो, पण विकास कामे थांबवू नका अशी विनवणी केली.
आमदार शेळके म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ५५ कोटींचा निधी मंजूर केला. त्या कामांचे इस्टीमेट झाले, मंजुरी झाली, टेंडरही झाले, वर्क ऑर्डर निघाली आणि राज्य सरकारने या कामांना स्थगिती दिली आहे.
एस आर अंतर्गत ११ कोटींची कामे, आदिवासी विभागातील कामे, दुधीवरे खिंड, कळकराई येथील कामांनाही स्थगिती दिली. दुधीवरे खिंड परिसरात सभागृहातील अनेकांचे फार्महाऊस आहेत, त्यामुळे माझ्या मतदारांसाठी नव्हे किमान सभागृहातील मंडळींसाठी तरी निधी द्या अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
याशिवाय, नगरविकास विभागाच्या माध्यमातूनही मावळ तालुक्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव मावळ, देहू नगरपंचायत साठी एकही रूपयाची तरतूद केलेली नाही. तुमचे पैसे नको किमान महाविकास आघाडीने मंजूर केलेले आमच्या हक्काचे पैसे तरी द्या अशी मागणी करत विकासकामात राजकारण करू नये असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

error: Content is protected !!