मावळमित्र न्यूज विशेष:
घरची परिस्थिती बेताची. वडील रेल्वे खात्यात नोकरीला. पण त्यांची शेतीशी नाळ जोडलेली.आई उत्तम गृहिणी तिची शेतीवर मोठी निष्ठा. घरात माणसांचा राबता. पै पाहुण्यांची ऊठबस.घरात एकत्र कुटूंब व्यवस्था असल्याने घरातील माणसे आणि मुक्या जनावरांवर मायेची सावली,हा मूळचा कौटुंबिक गाभा.
कुंडलिका नदीच्या तीरावरील शिवारात आनंदात या तरूणाचे बालपण गेले. उच्च शिक्षण घेऊन त्याने प्रपंचही नेटका केला.अन जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्याची सुख दु:ख आपली मानून हा तरूण त्यात रमला. विद्यार्थी दशेपासूनच त्याने लोकसेवेचा श्रीगणेशा केला. लोकसेवेचे हे त्याचे व्रत दिवसागणिक अधिकच समृद्ध होत  गेले आहे. याच बळावर गरूडझेप घेऊन त्याला भविष्याचा वेध टिपायचा आहे. पण तोही पाय जमिनीवर ठेवून.
सतत हसरा चेहरा,तोंडात साखर आणि डोक्यावर शांततेचा बर्फ असलेला हा तरूण. शांत ,संयमी पण तितकाच बिनधास्त आणि बेफिकीर स्वभावाने जनसामान्यांत लोकप्रिय आहे. सुस्वभावाचे बाळकडू पाठीशी असलेला ग्रामीण जनतेच्या अडीअडचणींवर हळुवार फुंकर घालणा-या या तरूणाचे नाव आहे, कैलास बबनराव गायकवाड. एम.काॅम.,डीआयटी पर्यत शिक्षण झालेला हा उच्चशिक्षित तरूण.
कांबेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेच्या मैदानावर त्याने खेळाची आवड जोपासली. जोर,बैठका मारून व्यायामाचे धडे गिरवले. त्यातून त्याने कुस्तीचा फड  गाजवला आणि क्रिकेटचे मैदान दणाणून सोडले. संघटन कौशल्याच्या जोरावर अनेक जीवाभावाचे मित्र जोडले आणि जपलेही.
वडील बबनराव गायकवाड रेल्वे खात्यात नोकरीला असले तरी त्यांचा ओढा शेतीकडेच. गाई वासरात ते रमायचे. सर्जाराजाला आळवती काळया मातीची ते  सेवा करायचे . पावसाच्या पाण्यावरील बिन भरवशाच्या शेतीला त्यांनी दूध धंद्याची जोड दिली. शेत मालाला आणि दूधाला किती भाव घ्यायचा याचा कोणातच अधिकार माझ्या बळीराजाला नव्हता आणि आजही नाही तरी पोटाची खळगी भरायला तो राबतो तसे गायकवाड कुटूब कालही राबत होते आणि आजही राबत आहे.आणि उद्याही राबवणार आहे.
अशा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील कैलास भाऊ. शेतीच्या कामात आई वडीलांना मदत करीत हा तरूण शिकला. करंजगावच्या ग्लोडन ग्लेडस माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण व्हीपीएस महाविद्यालय लोणावळ्यात ,पदवीचे शिक्षण इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव येथे पूर्ण केले  तर पिंपरी चिंचवड शहरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण या तरूणाने घेतले.
दरम्यानच्या काळात,भाऊ यशवंत गायकवाड यांना ग्रामपंचायतीत उपसरपंच पद भूषविले. काँग्रेस विचारांचा वारसा असलेल्या या कुटूंबाचे धर्मनिरपेक्ष विचारांच्या काॅग्रेस त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नाळ जोडलेली आहे.त्यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधींची आणि मातब्बर मंडळींचे घरी येणं जाणे होते.राष्ट्रवादी काॅग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांची री  पुढे कैलास गायकवाड यांनी तशीच ओढली.
कैलास भाऊ यांना विद्यार्थी दशेपासून हा राजकारणाची आवड होती.
विद्यार्थी दशेत त्यांच्यावर  पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांचा पगडा मनावर खोलवर रुजला होता. कैलास भाऊ यांनी स्वतःला विद्यार्थी चळवळी झोपून दिले. विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सतत मदतीचा हात पुढे असणाऱ्या कैलास यांनी ग्रामीण जनतेची आपली नाळ जोडली. हे पाहून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. तीन वर्षाच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रत्येक दिवस विद्यार्थी काँग्रेससाठी त्यांनी खर्च केला.
वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या लोकसंग्रह वाढवला. जेव्हा भावाचे मित्र जमवले. आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले.तद्नंतर त्यांच्यावर  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी आली. ते राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष विचारांना तळागाळापर्यंत रुजवू लागली. या कामाची दखल घेऊन मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षांनी त्यांच्यावर दिली.
अध्यक्ष पदावर वर्णी लागल्यावर ते  तालुका वर फिरले. पक्ष संघटना वाढीसाठी आणि बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवले.
  गावागावातील प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी सतत त्यांची धडपड सुरू होती. पुढे त्यांनी  मावळ युवा पूर्व फाउंडेशन स्थापना करून संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी सामाजिक उपक्रमावर भर दिला. समाज हिताचे उपक्रम राबवताना पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांनी सामाजिक संदेश जपला.
  वृक्षारोपण, स्वच्छता ,आरोग्य, शिक्षण यासाठी ते कार्यरत आहे. दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारी संकटात अनेकांना त्यांनी मदतीचा हात मिळून दिला. यासाठी केलेली पळापळ ही सगळी सर्वांनी पाहिली. गाव पातळीवर काम करताना शाळा समितीचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले पत्नी तृप्ती कैलास गायकवाड या कांब्रे कोंडिवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या .तर भाऊ यशवंत बबनराव गायकवाड उपसरपंच होते.
गाव पातळीवरील कारभाराची जाणीव असलेल्या या तरुणाला नेतृत्व करण्याची अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे. यापूर्वी वडेश्वर पंचायत समिती गणातून कैलास गायकवाड यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचा आदेश मानून पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली .त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले .
आता जिल्हा परिषदनिवडणकीचे पडघम वाजायला लागले आहेत. या निवडणुकीत संधी मिळवी यासाठी त्यांची सुरू असलेले प्रयत्न हे सर्वश्रुत आहे.ताकाला जाऊन गाडगे लपवायचा हा त्यांचा पिंड नाही .काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद मतदार संघात संधी मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. बदलत्या काळानुरूप भविष्याचा वेध घेत या मतदार संघाला उंचीवर नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास कैलास गायकवाड या तरुणाला आहे, या तरूणाचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी माता महालक्ष्मी देवी सुयश देवो अशी प्रार्थना त्यांचे समर्थक ‘ देवी महालक्ष्मी चरणी करीत आहेत.

error: Content is protected !!