त्यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली कामे त्यांच्या पश्चात त्यांच्या स्मृतीचे चिरकाल स्मरण करून देतील: अशोक वाडेकर
मावळमित्र न्यूज विशेष:
वाहनगावच्या जडणघडणीमध्ये गावातील अनेक जुन्या पिढीतील व्यक्तींचे योगदान महत्वपूर्ण ठरते. त्यांचाच वारसा पुढे श्री.जाखोबा भाऊ वाडेकर यांनी जपला. त्यांनी सतत  पंधरा वर्ष ग्रुप ग्रामपंचायत डाहुली सदस्य व सरपंच म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचे जबाबदारी सांभाळून विकासामध्ये योगदान दिले. त्यानंतर त्यांचे पुतणे कै. श्री. सुदाम यशवंत वाडेकर यांनी विकासाची री ओढीत विकास कामांना प्राधान्य देत गाव विकासाचा चढता आलेख उभा केला.
कै.सुदामराव वाडेकर यांनी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीत नोकरी केली.त्यावेळेस ते वडगाव मावळ या ठिकाणी स्थायिक होते.परंतु नंतरच्या कालावधीमध्ये ते  ग्रुप ग्रामपंचायत डाहूलीच्या सरपंच पदी विराजमान झाले आणि गावात विकासाचे वारे वाहू लागले.
           महादेव फाटा मंदिरापासून गावांमध्ये जाताना लाल फुपाट्यातून व दगडातून बैलगाड्या, सायकल तसेच  पायी चालत जावे लागत असे अशा या परिस्थितीमध्ये मुंबई पुण्यासारख्या हायवे स्वरूपाचा जो डांबरीचा रस्ता होता त्या स्वरूपाचा रस्ता गावामध्ये आणण्याचं काम  सरपंचांनी त्या कालावधीमध्ये केले त्यामुळे आता गावांमध्ये येणं जाणं सुखकर झाले होते.तत्कालीन आमदार श्रीमती रूपलेखाताई ढोरे यांच्या विकास निधीसह मिनीम्हाडा योजनेतील अनेक कामे गावात झाली.
            गावातील महिलांना पिण्यासाठी  विहिरी वरती पाणी आणण्यासाठी तसेच तळ्यावरती कपडे धुण्यासाठी जावे लागत होते अशा या कालखंडामध्ये सरपंच सुदामराव वाडेकर यांनी गावांमध्ये जल जीवन योजना राबवून गावांमध्ये नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होऊ लागला व माता-भगिनींच्या डोक्यावर हंडा  कायमचा कमी केला. आणि एक वेगळे प्रकारचे सुख व समाधान गावातील माय माऊलींच्या चेहऱ्यावर दिसू लागले ते केवळ सुदामराव यांच्यामुळेच आणि त्यामुळे गावातील लोक त्यांना विकासपुरुष असे संबोधू लागले.
             एवढ्याच कामावर सुदामराव शांत बसतील ते कसले त्यांनी स्वर्गीय दिलीपशेठ टाटिया यांच्या पुढाकाराने 1995 मध्ये भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाची स्थापना करण्यामध्ये ते यशस्वी ठरले .त्यासाठी गाव कारभाऱ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची साथ दिली. आतापर्यंत या विद्यालयातून शेकडो  विद्यार्थी शिक्षण घेऊन आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत ते केवळ सुदामराव यांच्यामुळेच नंतरच्या कालावधीमध्ये सुदामराव यांची काम करण्याची पद्धत त्यांची धडाडी हे पाहून ते मावळ तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले तसेच त्यांनी तर अनेक पदेही नंतरच्या कालावधीमध्ये उपभोगली असा हा विकास पुरुष आपल्यातनं कायमचाच निघून गेलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कामाचा मागवा घेण्याचा हा थोडासा प्रयत्न आहे.
             त्यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली कामे त्यांच्या पश्चात त्यांच्या स्मृतीचे चिरकाल स्मरण करून देतील यात कोणतेही शंका नाही. सुदाम भाऊ नावाचा आधारवड अनंतात विलीन झाला, त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शब्दांना पूर्णविराम .
             ( शब्दांकन-अशोक भिवाजी वाडेकर, उपशिक्षक ग्लोडन ग्लेडस माध्यमिक विद्यालय)

error: Content is protected !!