अनेक वर्षांचा पाणीटंचाई चा प्रश्न सुटणार; आमदार शेळके साते नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ
वडगाव मावळ :
मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या साते, ब्राम्हणवाडी, मोहितेवाडी व विनोदेवाडी येथील ४ कोटी ७७ लाख रुपये खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान या योजनेमुळे साते गाव व वाड्यांचा अनेक वर्षांचा पाणीटंचाई चा प्रश्न सुटेल असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा नियोजन सदस्य विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक अध्यक्ष किशोर सातकर, महिलाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, सुवर्णा राऊत, संध्या थोरात, उमा शेळके, दिपक हुलावळे, अंकुश आंबेकर, सरपंच संतोष शिंदे, उपसरपंच आम्रपाली मोरे, ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ आगळमे, संदीप शिंदे, सखाराम काळोखे, गणेश बोऱ्हाडे, भारती आगळमे, मीनाक्षी आगळमे, ज्योती आगळमे, श्रुती मोहिते, वर्षा नवघणे आदी उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले की, शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी मावळातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे ते विकासापासून वंचित राहू नये यासाठी मागील अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकास निधी तालुक्यात आणला. परंतु तालुक्यातील विकास कामांमध्ये खोडा घालण्यात काहींना समाधान वाटते हे दुर्दैव आहे. सत्ता असो वा नसो तालुक्यातील जनतेच्या हिताची कामे थांबणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे असाही टोला लगावला.
या पाणीपुरवठा योजनेंतर्गत साते ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाडी-वस्तीवरील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी इंद्रायणी नदी पासून गावापर्यंत ६ किलोमीटर लांबीची मुख्य पाईप लाईन करण्यात येणार आहे. नदीतून आलेले पाणी साठविण्यासाठी मोहितेवाडी येथे ४७ हजार लिटर क्षमतेची, साते येथे ४२ हजार लिटर क्षमतेची व ब्राम्हणवाडी येथे २ लाख ८० हजार लिटर क्षमतेची अशा तीन पाण्याच्या टाक्या बनविण्यात येणार आहेत. 
नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी याठिकाणी ०.८ एमएलडी क्षमतेचा म्हणजेच एका दिवसाला ८० हजार लिटर पाणी फिल्टर करणारा फिल्टर देखील बसविण्यात येणार असून घरांपर्यंत पिण्याचे पाणी वितरीत करण्यासाठी सुमारे ६ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती या कामाचे ठेकेदार आदित्य कन्स्ट्रक्शन यांनी दिली.

error: Content is protected !!