मावळमित्र न्यूज विशेष:
‘माझं गाव,माझा स्वाभिमान’ स्पर्धेत सहभागी होऊन दहा लाख रूपयांची बक्षीसे जिंका,असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसा पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा पर्यत ही स्पर्धा असणार आहे.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुनिल शेळके यांनी या अभिनव स्पर्धेची घोषणा केली.वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेची माहिती देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,कार्याध्यक्ष साहेबराव कारके,माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष संदीप आंद्रे,वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे,मुख्य संघटक संजय बाविस्कर, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष किशोर सातकर,विद्यार्थी अध्यक्ष समीर कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलैला असतो,या दिवशी सुरू झालेली स्पर्धा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसा पर्यत असणार आहे. ‘स्पर्धा विकासाची या थीमवरील या स्पर्धेत ‘ माझं गाव,माझा स्वाभिमान ‘हे ब्रीदवाक्य होऊन गावकरी व ग्रामपंचायतीला सहभाग घेता येणार आहे.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” शासनाच्या विकास निधी बरोबर भरघोस बक्षीसे मिळवून,गावचा विकास साधता येईल अशी ही स्पर्धा आहे. मागील ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि लाखोंचे बक्षीस जिंका असेही आवाहन केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतीला कोटीच्या घरात निधी दिला आहे. या निधीतून गावांचा कायापालट झाला हे आपल्याला पाहता येईल.
याही स्पर्धेत तालुक्यातील सर्व गावांनी सहभागी व्हावे. एका स्पर्धेसाठी प्रत्येकी एक लाख रुपयाचे बक्षीस गावाला दिले जाणार आहे.सर्व दहा निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीना या व्यतिरिक्त आमदार निधीतुन दहा लक्ष निधी.सर्व दहा निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीना या व्यतिरिक्त आमदार निधीतुन दहा लाख रूपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१.शंभर टक्के कर वसुली २.तंटामुक्त गाव, ३.स्वच्छ पाणी पुरवठा, ४.आयएसओ नामांकन मिळवून डिजिटल शाळा,५.घनकचरा व्यवस्थापन, ६.खड्डेमुक्त रस्ते,७.शासकीय कर थकीत नसलेले गाव आणि ग्रामपंचायत, ८.महिला सक्षमीकरण,९.प्रभावी पणे शासकीय योजना राबवण्यावर भर, १०. हागणदारीमुक्त गाव अशा दहा स्पर्धेत सहभागी होणा-या गावाला अथवा ग्रामपंचायतीला प्रत्येक स्पर्धेसाठी एक लाख रूपयाचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि २१ लाखाचा निधी मिळावा या स्पर्धेत सहभागी झालेल्या पाचाणे,येलघोल,आढे,सोमाटणे,नवलाखउंब्रे,दारूंब्रे,कुसगाव पमा,आंबेगाव या ग्रामपंचायतींना अनुक्रमे ३६०.७८ लाख,८८ लाख,९० लाख,३२१.३० लाख,१०६.५५ लाख,१०३.८८ लाख,२५८.५२ लाख,६९ लाख रूपये विकास निधी मिळाला असून कामे विकास कामे मार्गी लागली आहे,याकडे ही आमदार शेळके यांनी लक्ष वेधले.

error: Content is protected !!