मावळमित्र न्यूज:
भाताचे आगर असलेल्या मावळात भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.गावोगावी शेतकरी बांधव भात लावणीच्या कामात व्यस्त आहे. काही शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने भात शेती करतोय. तर काही बांधवांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यासाठी चारसुत्री पद्धत,दोरी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यांत्रिकीकरणाने लावलेली शेती,आपणाला सध्या मावळात पहायला मिळेल.
कृषी विभागाने विकसित केलेल्या इंद्रायणी,फुले समृद्धी,रत्ना या वाणाबरोबर कोळंब,चिमणसाळ याही वाणाची लागवड होत आहे.उत्तम प्रकारचा सुवासिक वास असलेल्या आंबेमोहर वाणाला काही अल्प प्रतिसाद पहायला मिळतोय.
मावळातील पश्चिम भागात भातशेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.बाराही महिने याच धान्यावर उपजीविका करणारे अल्पभूधारक शेतकरी शेती करण्यात व्यस्त आहे.
वेगवेगळे संपादन आणि जमीन खरेदी विक्री मुळे सधन शेतकरी वर्गाचा आजमितीस अल्पभूधारक शेतकरी यांच्या यादीत समावेश झाला आहे.
भातशेतीच्या कामाला पुरेसा मजूरवर्ग मिळत नसल्याने इरजिक पद्धतीने भात लावणीची रीत खेडोपाडी पहायला मिळेल. ऐकामेकाला भात लावणी च्या कामात मदत करायची. दुपारची न्याहारी शेतीच्या बांधावर बसून करायची अशीही साधारण पद्धत असते.बळीराजा कधी बैलाच्या खांद्यावर जोखड ठेवून चिखलणी करतोय तर कधी ट्रॅक्टरच्या मदतीने चिखलणी करून भात लावणी च्या कामात व्यस्त आहे.पारंपारीक गाणी गात महिला शेतकरी शेतीच्या कामात आघाडीवर आहेत.

error: Content is protected !!