कामशेत :
पावसाळ्यात आरोग्यासह पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून, चिखलातून चालावे लागते.शेतकरीवर्ग चिखलात जाऊन शेतीची कामे करीत असतात.तर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,कामगार यांचा  ट्रेन, बस, एसटीच्या प्रवासात पाय ओले होतात,घाण  होतात,अशा वेळी इन्फेक्शन होऊ शकते.त्यामुळे पायांची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी व्यक्त केले.
पावसाळी सॅण्डल्स फार घट्ट किंवा कडक असू नयेत, यामुळे पायाची बोटे अधिक आखडली जातात. बंद प्रकारातले किंवा पावलाखाली, बोटांजवळ पाणी साचवून ठेवणारे सॅण्डल्स वापरु नयेत, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. प्रवासात किंवा ऑफिसमध्ये संधी मिळताच सॅण्डल्स थोडावेळ काढून ठेवावेत. पावलांना कोरडे होऊ द्यावे.
पायांच्या बोटांशी सतत पाण्याचा संपर्क आल्याने, बोटांच्या बेचक्यांमधील त्वचा पांढरी होते. तिथे चिखल्या होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून, त्वचा कोरडी करुन तिथे अँटी फंगल पावडर लावावी. पाण्यामुळे तळपायाची फाटलेली त्वचा कात्रीने कापण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे, इजा होऊन जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते.
महावीर हाॅस्पिटलच्या रेडीयंट युनिटचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा म्हणाले,”
जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी, झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. पायांना आराम मिळेल. अशाने, भेगांमध्ये, नखांमध्ये अडकलेली माती निघून जाईल. पाण्यात अॅन्टिसेप्टिक लिक्विडचे काही ड्रॉप्सही टाकू शकता. पावसाळा त्वचेला मॉइश्चराईज्ड ठेवत नाही, तर त्वचेतील ओलसरपणामुळे संसर्ग होण्याच्या शक्यता वाढवते. म्हणून पाय गरम पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर, पुसून कोरडे करावेत आणि त्यावर मॉइश्चराईजर लावून मसाज करावा.
खोबरेल तेल थोडे कोमट करुन भेगांवर हळूहळू चोळावे आणि थोड्यावेळाने कोरड्या कापडाने टाचा आणि तळवा स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे, भेगांचे दुखणे कमी होऊन त्वचेचा कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते.साय आणि साखरेच्या मिश्रणाने भेगांवर मसाज केल्याने भेगा कमी होण्यास मदत होते.
पारदर्शक किंवा कुठल्याही रंगाचे नेलपॉलिश लावल्यास नखांच्या कडेला माती साचून ती दुखत नाहीत. पावसाळ्यात पेडिक्युअर करणेही फायदेशीर ठरते. त्वचा व्यवस्थित स्वच्छ केल्याने फंगस इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो.

error: Content is protected !!