पावसाळ्याच्या सुरवातीला सापांचा वाढला वावर
सापांपासून सावध राहा ; साप दिसल्यास सर्पमित्रांना बोलवा
मावळमित्र न्यूज विशेष :
सापांच्या बिळामध्ये पावसाचे पाणी गेल्याने बिळामधून साप बाहेर पडू लागले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी पेरण्या व खरीप हंगामातील शेतीच्या कामात व्यस्त आहेत. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी साप दिसल्यास त्यापासून दूर राहावे तसेच नागरिकांनी आपापल्या घराचा परीसर स्वछ ठेवावा. साप आढळल्यास आपल्या परिसरातील सर्पमित्राला बोलवावे.
मावळ तालुक्यात नाग, मण्यार, घोणस, फुरसे व चापडा हे मुख्य पाच विषारी साप आढळतात. धामण, कवड्या, तस्कर, कुकरी, रुका, दिवड, डुरक्या घोणस, नानेटी, गवत्या हे बिनविषारी तर मांजऱ्या, हरणटोळ, हे सौम्य विषारी साप आढळतात. सध्या पावसाळ्याची सुरवात आहेत. बिळातील साप बाहेर पडले असून त्यांच्या वावर वाढला आहे. विषारी सापही वावरत असल्याने सर्पदंश होण्यापासून काळजी घेण्याची गरज आहे. विषारी सापाच्या दंशामुळे जिवही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सापांपासून दूर राहण्याची, घराचा परीसर स्वच्छ ठेवण्याची, शेतकऱ्यांनी शेतावर काळजीपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे.
•*साप दिसल्यास काय करावे*
घराच्या परिसरात साप दिसल्यास त्याला न मारता त्यापासून दूर व शांत राहा. आपल्या परिसरातील सर्पमित्राला बोलवा. सर्पमित्र येईपर्यंत त्यावर बारीक लक्ष ठेवा. लहान मुलांना, घरातील पाळीव प्राण्यांना त्यापासून दूर ठेवा. त्याला पकडण्याच्या प्रयत्न करू नये. पकडण्याचा प्रयत्न केला तर साप हल्ला करून दंश करु शकतो. शेतावर साप आढळल्यास त्याला मारू नये. त्यापासून दूर राहून त्याची वाट मोकळी करा. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करणाऱ्या उंदरांचा तो फस्त करण्याचे काम करत असतो.
•*साप चावल्यास काय करावे*
साप चावल्यास घाबरून न जाता चावलेली जागा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. तांत्रिक- मांत्रिक च्या नादी न लागता सरळ जवळचे हॉस्पिटल गाठावे. कारण विषारी सर्पदंशावर ‘अँटी स्नेक व्हेनोम’ हे एकच औषध माणसाचा जीव वाचविते. शक्यतो चावलेल्या सापाचा फोटो लांबून मोबाईल मध्ये काढून ठेवा. कारण कोणता साप चावलाय व उपचार करण्यासाठी डॉक्टरांना सापाच्या फोटोमुळे मदत होते. बिनविषारी साप चावला असेल तर हॉस्पिटल मध्ये जाणे टाळा कारण खाजगी डॉक्टर रुग्णाला विषारी साप चावलाय असे भासवून पैसे लुटण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी सापाची ओळख पटविण्यासाठी जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधा.
अनिल आंद्रे, अध्यक्ष, वन्यजीवरक्षक संस्था मावळ म्हणाले;”
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी साप हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. आपल्या घराचा परिसर स्वछ ठेवावा. परिसर घाण असेल तर तिथे उंदरांचा वावर वाढतो. उंदीर असेल तर तिथे साप नक्कीच येतील. त्यामुळे परिसर स्वछ ठेवावा. साप आढळल्यास त्याला न मारता आम्हास संपर्क साधावा. झोपताना कॉट किंवा बेडचा वापर करावा. सर्पदंश झाल्यास मांत्रिक  मंदिर न पाहता दवाखान्यात जावे.

error: Content is protected !!