वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील १०० पोल्ट्री व्यावसायिकांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वतंत्रपणे पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे सुतोवाच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिला.
शेतकऱ्यांनी शेती बरोबरच शेतीपुरक व्यवसाय करावेत म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतीपुरक व्यवसायना विशेष कर्ज धोरण सुरू केलेले आहे. शेतकऱ्यांना पोल्ट्री, डेअरी पॉलीहाऊस नर्सरी, कृषी पर्यटन आदी व्यवसाय करावेत असे आवाहन दाभाडे यांनी केले आहे.
बँकेने पोल्ट्री व्यवसायासाठी नुकतेचसुधारित धोरण जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना नविन पोल्ट्री सुरू करण्यासाठी कर्ज, स्वयंचलित (अॅटोपोल्ट्री) पोल्ट्री उभारण्यासाठी कर्ज, तसेच. ओपण पोल्ट्री फार्मसाठी भांडवलासाठी, पक्षी घेण्यासाठी, खाद्य व औषधे घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. असेही दाभाडे यांनी यावेळी सांगितले.
ओपण पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी पक्षी घेण्यासाठी व खाद्य तसेच औषधे यासाठी विशेष मार्गदर्शनही केले जाणार आहे. याशिवाय पक्षी विक्री (मार्केटिंग) करण्यास सहकार्य केले जाणार आहे. फार्मरनी पोल्ट्री कंपन्यांशी करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःचा स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करावा असे आवाहनही दाभाडे यांनी केले.
येत्या दि १ ऑगष्ट पासून कर्ज प्रकरने स्विकारली जाणार आहेत. मावळ तालुका पोल्ट्री संघटनेने यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक दाभाडे यांनी केले आहे. बँक पहिल्या टप्प्यात १०० पोल्ट्री फार्मरची प्रकरण करणार आहे. ज्या पोल्ट्री फार्मरला कर्ज प्रकरण करायचे आहे त्यांनी पुणे जिल्हा सहकारी बँक शाखा अथवा आपली विकास सोसायटीचे सचिव तसेच मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन दाभाडे यांनी केले.

error: Content is protected !!