पायी वारी..हेच लेणं घेऊन त्यांचं जगणं..अन  विठू रायाचे नामस्मरण ..ज्ञानोबा तुकारामांचे गोडवे.. गात मरणं…
‘ त्यांनी जपलेल्या तत्वावर मावळ तालुक्याचा, वारकरी संप्रदाय फुलला आणि बहरला ‘
मावळमित्र न्यूज विशेष:
गळ्यात पवित्र तुळशीची माळ..कपाळी चंदनाचा टिळा..मुखी सावळ्या विठू रायाचे नाव..पंढरीची आषाढी वारी..आणि कार्तिकीला आळंदीची वारी..त्र्यंबकेश्वरी निवृत्तीरायांच्या दर्शनाची आस घेत, केलेली पायी वारी..हेच लेणं घेऊन त्यांचं जगणं झाले.आणि विठू रायाचे नामस्मरण करीत..ज्ञानोबा तुकारामांचे गोडवे गात मरणं.
निवृत्ती..ज्ञानदेव…सोपान.. मुक्ताबाई..एकनाथ… नामदेव.. तुकाराम…चा हा  गजर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा.या ठेव्याला त्यांनी आयुष्यभर जपला अन संभाळलाही.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तत्त्वाशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही.आयुष्यभर तत्त्व जपली.जपलेल्या या तत्वावर मावळ तालुक्याचा वारकरी संप्रदाय फुलला आणि बहरला सुद्धा.
बहरलेल्या या  संप्रदायात अनेक माळयांनी बीजे पेरली.त्याची निगा राखली ,ती जोपासली आणि फुलवली देखील. वारकरी संप्रदायाच्या या मांदियाळीत शेटेवाडीतील वैकुंठवासी ह.भ.प.किसन महाराज  मुक्ताजी शेटे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. किंबहुना हे नाव घेतल्या शिवाय मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायचा अंक पुरा होऊ शकत नाही.ह.भ.प.वैकुंठवासी किसन महाराज मुक्ताजी शेटे यांना मावळ तालुक्याच्या वारकरी संप्रदायाचे अर्ध्यवू मानले जाते.
कीर्त्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥
भजाय सदा हरि कीर्तन गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ध्रु.॥
त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥२॥
नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये। मागाअ चालताहे संगें हरि 3॥
तुका म्हणे त्याला गोडी कीर्त्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥ या अभंगाच्या ओव्या ऐकल्या की, संत मांदियाळीतील सर्व संताची आठवण सहज येते. त्याच प्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत खेडोपाडी कीर्तन प्रवचन करणारे ह.भ.प. किसन महाराज शेटे यांचाही जीवनपट सहज नजरेतून तरळून जातो.
शेटेवाडी, आंदर मावळातील छोटेसे गाव.गाव कस म्हणावं अंद्रायणी तीरी वसलेली ही आमची वाडी.शेतीत राबणा-या हाताला दह्या दुधाची साथ होती. ओसाड माळरानावर गाई वासरे मनसोक्त चरायची. रवंथ झाला की अंद्रायणीच्या डोहात तृष्णा भागून परतायची.लालमातीची शेती आणि  लालमातीची कौलारू घरे हीच आमची ओळख.आख्ख गाव गुण्यागोविंदाने नांदायचं.प्रत्येकाच्या चुलीवर एक सारखे शिजायचे. कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नव्हता.होते फक्त प्रेम,आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी.शेटे कुटूबियं त्यापैकी एक.
शेतीला गवत व्यवसायाची जोड देऊन उत्पन्न मिळवणारे माझे माहेर. हा व्यवसाय माहेरीच नव्हता,सासरीही हाच व्यवसाय. किंबहुना संपूर्ण मावळातील नगद उत्पन्न मिळवून देणारा गवताचा  बाजार  हाच महत्वाचा व्यवसाय होता. या व्यवसायात  आमचं शेटे परिवार होताच.बारदान्याचे घर अशी ओळख असल्याने टाकवे बुद्रुकला छोट्या हाॅटेल व्यवसायात  शेटे परिवार होता. त्यामुळे शेती, गवत बाजार आणि हाॅटेल या सगळ्या व्यवसायात वैकुंठवासी ह.भ.प.किसन महाराज शेटे अर्थात बाबा यांचा सहभाग होता. या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळायचे.
लक्ष्मण व दत्तोबा हे भाऊ अनुसया,शाहूबाई,रेऊबाई, देऊबाई या  बहिणी. त्यामुळे गोकुळावाणी भरलेले घर कायमच आनंदात, सुखात आणि समाधानात होते.वैकुंठवासी ह.भ.प.किसन महाराज शेटे हे राष्ट्र भावनेने पेटलेले अंगार होते. जनसंघाचा विचार त्यांनी अंगीकारला होता. असे असले तरी घरात, माऊली तुकारामाचा गजर आणि श्री. विठ्ठल नामाचा जप चालायचा. श्रावण महिन्यात राम विजय, भक्ती विजय ग्रंथाचा वाचन आणि निरुपण होत असायचे. आणि यात बाबा आघाडीवर असायचे. सुख दु:खाच्या अनेक हिंदोळ्यावर बसून शेटे परिवाराची दिवसागणिक प्रगतीपथावर पावले पडत होती. शेटे बाबांना एका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.हे अपयश त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पाँईट ठरला.
मावळ तालुक्याच्या गावोगावी, खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर जाऊन किसन महाराज शेटे संताच्या अभंग ओव्यांचे निरूपण करू लागले. एक भाऊ खांद्यावर विणा घेऊन ‘राम कृष्ण हरी ‘मंत्राचा गजर करायचा, त्याच वेळी दुस-या भावाची बोट मृदुंगावर पडून त्याला साथ द्यायची आणि मिणमिणत्या कंदिलाच्या नाहीतर हिराळाच्या उजेडात विठ्ठल नामाचा गजर होयचा. कीर्तनातून शेटे महाराज निरूपण करायचे. पहाडी आवाजातील बाबांचा स्वर थेट हदयाला भिडायचा. अनेक दाखले देऊन ते वेगवेगळ्या अभंगावर प्रबोधन करायचे. कित्येकांना तुळशीच्या माळा घालून त्यांनी वारकरी केले. कित्येकांना भजनाची गोडी लावली. कित्येक जण किर्तनकार,प्रवचनकार झाले. कित्येक गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा यासाठी पुढाकार घेतला. कार्तिक महिन्यात पहाटे गावोगावच्या मंदिरात काकडा आरती सोहळा सुरू केला. कितीतरी गावी बांधलेल्या राऊळात विठूरायाच्या आणि रूख्मणी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यांचे शिष्य असलेल्या ह.भ.प.दत्तोबा महाराज वाडेकर यांनी पन्नास वर्षे आळंदी,पंढरीची पायी वारी केली तेही विणा घेऊन.
एक ना अनेक असे महाराज बाबांनी घडवले,त्यांना प्रोत्साहन दिले. अभंगाच्या आधारे त्यांनी निरूपण केले.टाळ,विणा,मृदंगाच्या गजरात निघालेल्या पायी वारीत ते नेहमीच सहभागी राहिले. सर्वसामान्य व भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचे,आळंदीला जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींचे,त्र्यंबकेश्वरी निवृत्ती रायांच्या दर्शनाचा योग त्यांनी अनेक वेळा घडवून आणला. मावळ तालुक्यातील असे एक ही गाव नाही,जिथे त्यांनी किर्तन अथवा प्रवचन केले नाही.गावोगावी त्यांची प्रवचने झाली,कीर्तने झाली. दोन्ही भावांनी वारकरी संप्रदायाच्या प्रसारासाठी मावळ पिंजून काढला होता.
परिणामी वारकरी संप्रदायाचे हे लेणं आपसूक आमच्या पदरी आले. संपूर्ण शेटे परिवारात विठ्ठल नामाचा गजर करणारे,गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून तिचे जतन करणारी चौथी पिढी आज वावरते याचा आम्हाला अभिमान आहे. बाबांचे जाणे झाले,तो दिवस आजचा होता.देहूतून संत तुकोबारायांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत होते. बाबांचे वय झाले होते,पण ऐकायला येत होत.समजत होते. पालखी प्रस्थानाची लगबग त्यांच्या ध्यानी येत होती. आता आपल्याला वारीला जाता येत नाही म्हणून त्यांचा जीव तळमळत होता. अंथरूणावर पडलेल्या जागेवर त्यांचा ‘ज्ञानोबा माऊली तुकारामाचा ‘गजर आम्ही लेकीसुना ऐकत होतो.
बाबांची ही तळमळ पाहून आम्हालाही हुंदके येत होते. पण आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप करणारा हा वैष्णव विठ्ठल नाम घेता घेता सोडून गेला.तेव्हा आपसूकच
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥
देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥
मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता ह्मणों नये॥
वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥
तुका ह्मणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥
या अभंगाच्या ओव्या ओठी आल्या.
हा सगळा लेखन प्रपंच करण्याचे कारण आज बाबांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त गतकाळातील दिवस आठवत गेले आणि  एक एक शब्द उमटत गेला.वारकरी संप्रदायाची जी   शिकवण बाबांनी दिली.त्याच शिकवणीवर चालत जाऊन श्री विठ्ठलाचे नाम कायम मुखी रहावे हीच भगवंता चरणी प्रार्थना करून शब्दांना पूर्णविराम.

error: Content is protected !!