सोमाटणे :
सडवली येथील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता मल्ल प्रतिक शंकर देशमुख यांची बिस्किक, किर्गिझस्तान येथे होणाऱ्या १७ वर्षांखालील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा प्रतिक देशमुख हा मावळातील दुसरा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आहे. प्रतिक हा कुमार गटासाठी १२५ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यापूर्वी मावळ तालुक्यातील शिवली गावचे भूमीपुत्र ऑलिंपिकवीर मारुती आडकर यांनी १९७२ साली पश्चिम जर्मनीतील म्युनिच येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.१७ वर्षांखालील कुमार एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाची निवड चाचणी नुकतीच दिल्ली येथील इंदिरागांधी स्टेडियममध्ये पार पडली.
या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत प्रतिकने १२५ किलो वजनी गटात दिल्ली, पंजाब व हरियाणा राज्यातील मल्लांचा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. त्यांची १८ ते २६ जून २०२२ या कालावधीत बिस्किक, किर्गिझस्तान येथे होणाऱ्या १७ वर्षांखालील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रतिक देशमुखने यापूर्वी झालेल्या सहा राष्ट्रीय स्पर्धांपैकी चार राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण व दोन रौप्य पदके व एक कांस्यपदक अशी चार पटकावली आहेत.
राजस्थान येथे झालेल्या सब ज्युनिअर विभागात ९२ किलो वजनी गटात सुवर्ण, दिल्ली आणि आसाम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ८५ किलो वजनी गटातील रौप्यपदकांचा समावेश असून, आसाम येथील रौप्यपदक हे खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेतील आहे. तर तीन महिन्यांपूर्वी रांची झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ११० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. प्रतिक हा पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुल येथे वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे व किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव व कुस्तीचे धडे घेत आहे.

error: Content is protected !!