चाळ एक गुरू
मावळमित्र न्यूज विशेष( सुभाष तळेकर,अध्यक्ष
मुंबई डबेवाला असोशिएशन):
आमच्या चाळीचे नाव द्वारकादास जिवराज चाळ मुंबई सेन्ट्रलला डॅा दादासाहेब भडकमकर असलेली चाळ अगदी शंभर वर्षा पुर्वीची त्या मुळे त्या काळात स्थापत्य नमुन्या नुसार ती बांधलेली.
चाळीच्या समोरच मफतलाल मिल च्या जागे मध्ये झालेली नवजीवन सोसायटी सारखी उत्तुंग ईमारती असलेली वसाहत होती. त्या काळात आशिया खंडांतील सर्वात मोठी सहकरी गृहनिर्माण संस्था असा तिचा नाव लौकिक होता.
आमच्या चाळीत कोकणस्थ,देशस्थ,गुजराती कुटूंब गुण्या गोविंदाने रहात असत. चाळीतील बहुंताश कुटूंब ही एकत्र कुटूंब पध्दतीची होती. चाळीतील घरे लहान १० बाय १० ची होती. कुटूंब मोठे आणी खोली लहान अशी स्थिती होती, पण मन मोठे असले की कोणतीच जागा अपुरी नसते हे माझ्या आजोबांनी आणी वडीलांनी दाखवून दिले होते.
आमच्या कुटूंबात डबे पोहचवण्याचा धंधा वडीलोपार्जित होता. त्या मुळे गावा वरून काही भावकीतील, गावकीतील, मंडळीना डबे पोचवण्याच्या कामावरीती मुंबईत आणले की त्यांची जेवणाची व रहाण्याची व्यवस्था करावी लागत असे.त्या मुळे ती मंडळी आमचे घरीच रहात असत व जेवत असत..
खोली जरी लहान असली तरी चाळीचे वठण मात्र मोठे होते. त्या मुळे या मंडळींची वळकटी या वठणात असे. झोपायला फुटपाथवर जात असत.सार्वजनिक पाण्याचा नळ असायचा .
त्या नळाला पहाटे ४ वाजता पाणी येत असे तेथे ते अंघोळ करत पहाटे ४ वाजता उठावे अंघोळ करावी व भुलेश्वर फुल मार्केटला हमाली करण्यासाठी जावे सकाळी ८ वाजे पर्यंत हेलपाटी करावी. त्यातुंन ५०/६० रूपये मिळायचे हे पैसे म्हणजे रोजचा खाण्या-पिण्याचा, चहा-पाण्याचा खर्च असायचा. डबे पोचवायचा पगार याला हात लावायचा नाही.
तो तसाचा तसा गावी पाठवायचा. या कामगारांचा प्रपंच ही अत्यंत कमी असायचा एक अंथरूणाची वळकटी व एक पत्र्याचा ट्रंक सामान ठेवण्यासाठी असे.चाळीत अनेक लोकांचा राबतां असल्यामुळे चाळीत नेहमी चैतन्य असायचे.श्रावण महीना आला की सणाची सुगी सुरू व्हायची.अनेक घरात ग्रंथांत लावले जायचे. हे ग्रंथ सी.पी टॅंग येथील माधवबाग येथुन भजन करत आणले जात.
रात्री चाळकरी ग्रंथ भक्तीभावाने ऐकत असत. श्रावण महीना म्हणजे धार्मिक महीना असल्यामुळे बर्याच चाळकर्यांचे सोमवार,शनिवार उपवास असायचे. गोपाळकाला तर आमच्यासाठी पर्वनी असायचा. चाळीतील मुलांचे गोविंदा पथक होते हे पथक मुंबई सेन्ट्रल,ग्रॅटरोड,ताडदेव येथे दहिहंडी फोडत असत. गणेशोत्सवात तर दहा दिवस जल्लोश असायचा.
चाळीतील ज्याच्या ज्याच्या घरी गणपती बसलेला असायचा तेथे आरतीला चाळकरी जात असत. ह्या आरत्या रात्री उशीरा पर्यंत चालत असे. त्या नंतर आम्ही मुले सार्वजनिक गणपती मंडळाने दर्शकांनसाठी चित्रपट ठेवलेले असायचे ते चित्रपट पहायला जात असे. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा दसर्याच्या दिवशी सोनं देण्याची मोठी परंपरा चाळीत असायची. दिवाळी तर चाळीचा जिव की प्राण चाळीच्या प्रत्येक घरावर आकाश कंदील टांगला जायचा यात वैशिष्टय असे की सगळे कंदील एकसारखे असायचे यातुन चाळीची एकी प्रतीत होत असे.
चाळीतील प्रत्येक घरात दिवाळीचे विविध पदार्थ बनवले जात.आपल्या कडील पदार्थाचे ताट भरायचे व शेजार्यांना द्यायचे ही चाळीची परांपरा,दिवाळीत विविध स्पर्धा आयोजित केल्या जायच्या विशेष करून मुला/मुली व महीलांन साठी या स्पर्धा असत. या स्पर्धेतून कला गुणांना वाव मिळावा व त्या गुणाची जोपासना व्हावी हाच उद्देश असायचा. जय पराजयाला कसे सामोरे जावे हे यातुन कळत असे.
होळीसणात तर चाळीत विविध रंगाची उधळण केली जायची रंगपंचमीला मुलांची यैना की बैना निघत असे.चाळीत कोणी आजारी पडले किंवा कोणाचा अपधात झाला तर चाळीतील जवळ जवळ सर्व तरूण मुले त्या व्यक्तीला घेउन रूग्णालयात जात असे. जो पर्यंत त्याला डिसचार्ज मिळत नाही तो पर्यंत नित्य नियमाने मुले रुग्णालयात हमकास चौकशी करत असत.
चाळीने आम्हाला स्वलंबन शिकवले
चाळीने आम्हला माणुसकी शिकवली
चाळीने आम्हला शिस्त शिकवली
चाळीने आम्हला जिवन संघर्ष शिकवला.
काळाच्या ओघात टॅावर संस्कृती मुळे चाळ संस्कृती लोप पावत चालली आहे. कालांतराने ती नष्ट होईल.
आता घर मोठे झाले पण कुटूंब छोटे झाले.
आर्थिक सुबत्ता आली पण माणुसकी गेली.
मोबाईल आला पण माणसे दुरावली.
आमची जुनी चाळ गेली व त्या जागी म्हाडाने जरीवाला संकुल उभे केले.

error: Content is protected !!