टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील शेवटचे टोक खांडी या भागातील स्थानिक नागरिक व पर्यटकांसाठी मुख्य रस्ता खड्डेमय झाला असून रस्त्याची अवस्था पूर्णपणे दयनीय झालेली आहे.
परिणामी मागील काही वर्षापासून हा प्रवास धोकादायक झाला असून दवणेवाडी ते टाकवे बुद्रुक परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी वाहने घसरून सतत अपघात घडत आहेत. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग असो वा या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार यासर्वांचे याकडे दुलर्क्ष झाले असल्याने, आता या अधिकाऱ्यांनीच सांगवे की या रस्त्यावरून वाहने कशी चालवावीत अशी संतप्त प्रतिक्रिया या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिली आहे.
दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी या भागातील रस्त्याची खड्डे भरून डागडुजी करण्यात आली होती परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे.
या रस्त्याचे काम होत नसल्याने याचा फटका या परिसरातील 20 ते 25 गावांसह हजारो लाखो पर्यटकांना बसत आहे. दोन्ही बाजुच्या साईड पट्ट्यांचा अभाव असल्यामुळे परिणामी रस्त्याच्या रुंदी मध्ये अंतर कमी झाले आहे.तसेच रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना व पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान या भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ मोठे धबधबे आहेत. पर्यटन क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावरती असल्याकारणाने या ठिकाणी शहरी भागातील अनेक नागरिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या भागात दाखल होत असतात.
रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. व्यवस्थितरीत्या काम न करणारे ठेकेदार यांना काळ्या यादीत टाका तर कामांकडे दुलर्क्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना खुर्च्या खाली करायला लावा अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळा तोंडावर आला असल्याने तात्काळ यामार्गावरील किमान खड्डे तरी योग्य प्रकारे बुजवावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
तसेच फळणे फाटा ते भोयरे या रस्त्याच्या साईट पट्ट्यांचे काम मागील अनेक महिन्यापासून बंद आहे. परिणामी अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून धोकादायक झालेल्या साईट पट्ट्या, रस्ता या ठिकाणी डांबरीकरण करावे जेणेकरून पावसाळ्यात धोका निर्माण होणार नाही अशी मागणी कामगार वर्ग, व्यवसायिक, विद्यार्थी, पर्यटक करत आहेत.

error: Content is protected !!