मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या निर्देशांनुसार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांना देण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महिलाध्यक्ष खासदार फौजिया खान यांनी राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे विद्याताई चव्हाण यांनी नियुक्तीपत्र दिले.
विद्याताईंना सामाजिक आणि राजकीय प्रश्नांचा अनुभव असून या पदाची जबाबदारी त्या योग्यरीत्या पार पाडतील, असा विश्वास सर्व वरिष्ठांनी व्यक्त केला. यातूनच सर्वानुमते विद्याताईंची महिला प्रदेशाध्यक्षदी निवड करण्यात आल्याचे खा. फौजिया खान यांनी सांगितले.
यासोबत पक्षाच्या महिला कार्यकारिणीत प्रथमच विभागीय अध्यक्षपदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याची घोषणादेखील फौजिया खान यांनी यावेळी केली. ज्यामध्ये विभागीय महिला अध्यक्ष पदासाठी अनुक्रमे नागपूर विभागासाठी शाहीन हकीम, अमरावती विभागासाठी वर्षा निकम, मराठवाडा विभाग (औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना) शाजिया शैख, मराठवाडा विभाग (बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद) वैशाली मोटे, पश्चिम महाराष्ट्र विभाग (सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा) कविता म्हेत्रे, पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे शहर-ग्रामीण, पिंपरी चिंचवड शहर) वैशाली नागवडे, कोकण विभागासाठी (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) अर्चना घारे, ठाणे विभागासाठी ऋता आव्हाड, उत्तर महाराष्ट्र विभागासाठी कविता परदेशी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!