मावळातील जुन्या परंपरा
गडद:
“गडद” गावात अनेक परंपरा आहेत.त्यातील च एक परंपरा आहे “देव आणने” आता देव आणने ही काय परंपरा आहे. ते मी तुम्हाला सांगतो “गडद” गावचे ग्रामदैवत आहे. भैरवनाथ महाराज,गावात भैरवनाथ महाराज्यांचे भव्य मंदीर आहे. आणी गावचे गुरव त्याची पुजा-आर्च्या वंश परंपरेने करत आहेत. परंतु या भैरवनाथ महाराज्यांचे मुळ स्थान हे कोथळीगडातील भैरवनाथांच्या गुहेत आहे.
त्या गुहेत छोटे खाणी भैरवनाथ महाराज्यांचे मंदीर आहे. देव घटी बसले की भैरवनाथ देव गडद गावातून आपल्या मुळ स्थानी म्हणजेच कोथळीगडला जातात अशी मान्यता आहे. मग या भैरवनाथ देवाला गावात परत आणण्यासाठी गावकर्यांना दसरा झाला की पहिल्या शनिवारी कोथळीगडाला जावून देवाला भक्तीपुर्वक गावात परत आणावे लागते. या परंपरेला म्हणतात “देव आणने “
नक्की साल आठवत नाही पण काही वर्षा पुर्वी मी गडद गावी मुक्कामाला होतो.दसरा सण झाला होता.व त्या नंतर चा शनिवर उजाडला होता. सकाळी सकाळी माझे मित्र चिंधू शिंदे,बाळु कौदरे,विश्वनाथ निकम हे माझ्या घरी आले आणी म्हणाले चल देव आणायला जायचे आहे.गडद ते कोथळीगड जवळ जवळ सहा सात तास चालावयाचे अंतर, अंतर सरळ असेल तर कितीही चालायला काही हरकत नाही.पण सर्व अंतर हे डोंगर दर्या ,झरे ओहळ नाले पार करणारे अनेक वेळा चढ उतार करावी लागणारे हे आपल्याला झेपेल की नाही ही शंका मनांत होती. पण चिंधू,बाळू,विश्वनाथ यांचे सोबत अनेक वेळा मी गावच्या डोंगर रांगांत भटकलो होतो. तर त्यांचे सोबत कोथळीगड चढणे काय अवघड आहे. आणी गावची परंपरा होती की प्रत्येक घरातील एक माणुस देव आणायला कोथळीगड ला गेलाच पाहीजे. नाही गेला.
तर त्यास पैशाचा दंड केला जात असे. मग आपण गावी आहोत तर कोथळीगड ला जावुन तो दंड का वाचवू नये ? असे मनात आले नी आम्ही कोथळीगड ची वाट धरली.सकाळी १० वाजता आम्ही घरा बाहेर पडलो माझे जवळ तर काहीही साहीत्य नव्हते. दोन वेळची शिदोरी आणी दोन चादरी व थोडे तांदुळ येवढेच सामान मित्रांनी सोबत घेतले होते. आंभु गावांची शिव आली तशी गडद गावकर्यांचे जत्थे नजरेला दिसु लागले.
जो तो गावकरी आपल्या वाडी,वस्ती व मित्रांचे जत्थे करून गटा गटाने कोथळीगडा कडे रवाना झाले होते. आंभु गावा नंतर मेठलाचे तोरणे हे गाव मागे टाकले. पुढे वांद्रे गावची पढारवाडी लागली पढारवाडी ही खेड तालुक्यांतील व पुणे जिल्ह्यातील शेवटची वस्ती या वस्तीला मागे टाकत आम्ही नाकिंदा च्या बोगद्या च्या परीसरात आलो तर तेथे बरेच गावकरी झाडाच्या सावलीत बसुन दुपारचे जेवण घेत होते.
कारण या येथे दगडात थंड पाण्याचे झरे होते दुपारचा एक वाजला होता तिन तास पायपीट झाली होती. पोटात भुक पेटली होती. विश्वनाथ निकमने आपली शिदोरी सोडली. प्रवास लांबचा होता वाटेत काहीही सोय नाही म्हणुन प्रत्येकाने जास्तच शिदोरी बरोबर घेतली होती. शिदोरी तरी काय तर ६ भाकरी आणी त्यावर मिर्चीचा ठेचा पण त्या जंगलात हातावर भाकर घेउन झाडाच्या सावलीत मित्रांन सोबत लंच करणे याची गम्मत काही औरच आहे.
दुपारचे जेवण झाले आणी नाकिंदा च्या बोगद्याच्या येथुन पुढील प्रवास सुरू झाला. बराचसा चढ चढून गेल्यावर डोंगराच्या माथ्यावर आम्ही आलो होतो. आता कोथळीगड नजरे च्या टप्प्यात आला होता.
पुढील प्रवास हा उतरणी चा होता. येथेच खेड तालुक्याची पर्यायाने पुणे जिल्याची हद्द संपत होती व कर्जत तालुक्याची पर्यायाने ठाणे जिल्याची हद्द सुरू होत होती. दोन तास उतरणीचा प्रवास अतंत्य अवघड होता.वाट अशी नव्हतीच जेथुन पाणी खाली वहाते त्या ओढे नाले यांच्या मार्गाने खाली जात होतो. दोन तासाच्या उतरणी चा प्रवास पेठ गावात संपला तेव्हा दुपार चे ३ वाजले होते.
पेठ गावात आम्ही पोचलो. काही आमचे गावकरी आमच्या आधी गावात पोचले होते तर काही आमच्या नंतर गावात पोचत होते. पेठ गावचे गावकरी आणी गडद गाव चे गावकरी यांचेत एक अनामीक नाते आहे. कारण जेव्हा कधी गडद गाव अस्तित्वात आला असेल तेव्हा पासुन अनेक पिढ्या या कोथळीगडला देव आणायला येतात. त्याचा जमेल तसा पाहुणचार पेठ गावचे गावकरी करतात.त्यांना चहापाणी देतात.
व किल्यावर प्रसाद बनवण्यासाठी सांगणारे साहीत्य भांडी-कुंडी ते देतात.चहा पाणी झाला की प्रसादासाठी लागणारी भांडी-कुंडी डोक्यावर घेउन गावकरी कोथळीगड चढू लागतात.
पेठ गावातून किल्ला उजवीकडे ठेवत एक रस्ता जातो.एक मोठ्या दगडापाशी त्याला अजुन एक फाटा फुटतो.तेथेही उजवी वाट पकडून वरच्या दिशेने आम्ही चालत राहीलो आणी थेट भैरवनाथांच्या गुहेत पोचलो. गुहे पर्यंत पोचायला साधारणता एक तास लागला.ही चढण एकदम खडी चढण असल्या मुळे चढताना मोठी दमछाक झाली. गुहेत बरेच से कोरीव काम नजरेस पडते.गुहेतील दगडी नक्षीदार खांब लक्ष वेधून घेतात.याच गुहेत कोणी तरी खडु ने लिहले होते गुल कहे गुलशन बदलता है।
आसमा कहे सितारे बदलते है।
मगर ये खामोश वादीयाॅ केहती है।
ईतीहास तो हम है सिर्फ जमाना बदलता है।
गुहेच्या तोंडाशीच एक वाट किल्ल्याच्या पोटातून कोरलेल्या पायर्यांनकडे जाते. एक संघ दगडात आतुन कोरलेल्या पायर्या हे या किल्ल्याचे वैशिष्ठे आहे. ह्या पायर्या मुळेच या गडाला कोथळीगड हे नाव पडले आहे. या पायर्या आपणाला किल्ल्याच्या माथ्यावर घेउन जातात. वरती एक दरवाजा आणी पाण्याचे टाके आहे. किल्ला मुख्यत्वे करून टेहाळणी साठी वापरत असल्यामुळे वरती फार जागा नाही.
ईतके फिरत असताना अंधार पडू लागला होता आम्ही सर्व गावकरी भैरवनाथांच्या गुहेत जमलो. भैरवनाथ देवाची पुजा करून आरती म्हणण्यात आली.येव्हाना रात्र झाली होती. ज्याने त्याने आप आपली शिदोरी सोडली होती. काही तरूण मुले तर गड माथ्यावर जेवायला गेली. आम्ही ही त्यांचे मागे अंधारात डोंगर माथ्यावर शिदोरी खावयास गेलो.
अपण किल्ल्याच्या माथ्यावर,सोबत सह्याद्रीच्या रांगा, हिरवा निसर्ग आणी शरदाच्या चांदण्यात आपण जेवत आहोत. याचा आनंद हा अवर्णनीय आहे. जेवण झाल्यावर पुन्हा आम्ही भैरवनाथांच्या गुहेत आलो तो पर्यंत गोसावी बाबा ची कथा चालु झाली होती गावकरी तल्लीन होउन कथा ऐकत होते. आम्ही ही गुहेत एक चादर अंथरली व त्या वर पडुन कथा ऐकत होतो पण कथा ऐकता ऐकता झोप कधी लागली ते कळलेच नाही.
दुसर्या दिवशी सकाळ झाली गावकर्यांनी सोबत तांदुळ आणले होते.
त्याचा प्रसाद बनवण्याचे काम चालु होते.बाळु कौदरे हा गुरव असल्या मुळे देवाचे सर्व सोपस्कार तो पार पाडत होता.सर्व सोपस्कार पुर्ण झाल्यावर देवाची आरती झाली.
व सर्व गावकरी पंगती ने प्रसाद खाण्यास बसली येथे ही निसर्गाने मदत केली ती अशी की या किल्ल्या भोवती कौदरी ची खुप झाडे आहेत ( जवळ जवळ केळीच्या झाडा सारखी) त्यांची पाने पत्रावळी म्हणुन उपयोगी पडली.
प्रसादाचे जेवण झाल्यावर गावकर्यांची हजेरी घेतली गेली.जे गावकरी हजर आहेत त्यांची यादी बनवली गेली. पुन्हा एकदा भैरवनाथ महाराजांचा गजर गावकर्यांनी केला आणी भैरवनाथ महाराज्यांना प्रतिकात्मक रित्या घेउन गडद ग्रामस्थ पुन्हा परतीच्या वाटेला लागले.
(शब्दांकन- सुभाष तळेकर, मु.पो.गडद)

error: Content is protected !!