मावळात शाळा पूर्वतयारी उपक्रम जोरात
खांडी:
शासकीय आदेशानुसार मावळ तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सध्या शाळा पूर्वतयारी हा उपक्रम जोरात सुरु आहे.कोरोनामुळे या वर्षी शाळा उशिरा सुरु झाल्या.पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यात शाळा सुरु ठेवण्याचा शासकीय आदेश आला.
त्यामुळे मावळातील सर्व शाळा एप्रिलचा पंधरवडा उलटून गेला तरीही गजबजलेल्या दिसत आहेत.शाळा पूर्वतयारी उपक्रमाद्वारे नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत केले जात आहे.मराठी शाळांचे महत्त्व समजावून सांगत जिल्हा परिषदेच्या शाळेतच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहनही केले जात आहे.
शाळा पूर्वतयारी उपक्रम राबवताना काही शाळांमध्ये नवागतांचे बैलगाडीत बसून तर काही ठिकाणी ट्रँक्टरमध्ये स्वागत करण्यात आले.मुलांचे वजन व उंची तपासणे,लहान-मोठी वस्तू ओळखणे,मनोरंजनात्मक खेळ घेणे,चित्रवर्णन,कुटूंबाची माहिती सांगणे,वर्गीकरण करणे इ.उपक्रमांतून विद्यार्थ्यांची उत्तम रितीने पूर्वतयारी करुन घेतली जात आहे.हा उपक्रम राबवताना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.
ग्रामस्थ व गावातील पदाधिकारी स्वतः या उपक्रमात हिरीरीने भाग घेत आहेत.अनेक ठिकाणी बैलगाडीचे सारथ्य शिक्षकांनी केल्याने सर्वत्र कौतूक होत आहे.शाळाबाह्य मुलांची संख्या घटण्यासाठी व १००% पटनोंदणी होण्यासाठी हा उपक्रम साहाय्यभूत ठरत आहे.
सुजाता भोसले मुख्याध्यापिका,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कुसूर म्हणाल्या,”
शाळा पूर्वतयारी हा उपक्रम विद्यार्थी व पालक यांना आवडला आहे.या उपक्रमामुळे नवागत मुले शाळा प्रवेशासाठी बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या तयार आहेत की नाहीत हे समजते.तसेच त्यांच्या मनात शाळेविषयी गोडी निर्माण होण्यास मदत होते.
श्री.कृष्णा भांगरे
केंद्रप्रमुख,भोयरे म्हणाले,”
शाळा पूर्वतयारी उपक्रम हा विद्यार्थी हीताचा असून तो मनोरंजनात्मक पद्धतीने राबवला जात असल्याने सर्वांच्या आवडीचा बनला आहे.या उपक्रमामुळे पालक व नवागत विद्यार्थी यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा असे वाटू लागले आहे.
दाखलपात्र विद्यार्थीनी,जि.प.प्रा.शाळा,
धानगव्हाण कु.मृण्मयी रमेश कदम म्हणाली,”
आमच्या गावातील शाळेत आमचे वाजतगाजत स्वागत झाले.गावातील महिलांनी औक्षण केले तसेच शाळेत खाऊही मिळाला.फुगा हातात घेताना मला खूप आनंद वाटला.जून महिन्यापासून मी दररोज शाळेत जाणार आहे.

error: Content is protected !!