नात्यांची वीण घट्ट जपणारे मामा खांडभोर गुरुजी
मावळमित्र न्यूज विशेष:
निसर्गरम्य आंदर मावळाच्या पश्चिमेला असणारे चिमुकले गाव नागाथली.उंच-उंच डोंगर, मुसळधार पाऊस,भातशेती आणि सोबतीला टाटाचे जलाशय हे नागाथली गावचे वैशिष्ट्य.या गावात जिजाबाई व यशवंत खांडभोर या शेतकरी दांपत्याच्या पोटी मथाबाई व सीताबाई या दोन मुलींच्या जन्मानंतर धोंडिबा नावाच्या मुलाचा जन्म झाला.
घरची हलाखीची परिस्थिती,कुडा-मेढीचे घर व उपजीविकेसाठी भातशेती व मोलमजुरी करून प्रतिकूल परिस्थितीतही सुखी संसार सुरू होता.पण अचानक काळाने घाला घातला व यशवंत खांडभोर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.संपूर्ण कुटुंब पोरके झाले. लहानगा धोंडिबा आणि दोन बहिणी यांचे पितृछत्र हरपले. संसाराची गाडी पुढे ओढण्याची जबाबदारी आई जिजाबाई यांच्या खांद्यावर येऊन पडली.
मोलमजुरी करत कुटुंब चालवत असताना जिजाबाईला लाडका लेक असणाऱ्या धोंडिबाच्या शिक्षणाची चिंता सतावत होती. धोंडीबाने आईला शेतीकामात मदत करावी असा गावातील लोकांचा आग्रह होता .परंतु जिजाबाईंनी मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले .यावरून गावकऱ्यांशी मतभेद झाले.
पण मनात मुलाला शिकवायचा तिचा निर्धार पक्का होता.लहानगा धोंडिबा आईला शेतीकामात मदत करून अभ्यासात चुणूक दाखवत होता.दरम्यानच्या काळात धोंडीबाच्या दोन्ही मोठया बहिणींची लग्ने उरकली.त्यातील सीताबाई नावाची बहीण वाहनगाव येथील वाडेकर परिवारात दिली.तेथून पुढे खांडभोर आणि वाडेकर परिवाराचे स्नेहाचे नातं जोडले गेले.प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी धोंडीबाने मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेले वडगांव गाठले .
शिक्षणाबरोबरच खेळातही चमक दाखवली. मावळच्या ग्रामीण भागातुन आलेला चुणचुणीत विद्यार्थी पाहून शिक्षक व वर्गातील विद्यार्थी देखील अवाक झाले.मुलाच्या यशाने आई जिजाबाई व बहिणी आनंदून गेल्या होत्या.शिक्षण पूर्ण झाल्यावर धोंडिबाला शिक्षकाची नोकरी मिळाली.आईच्या व बहिणींच्या आनंदाला पारावार उरला नाही.पायजमा-शर्ट व पांढरी टोपी असा मावळी पोशाख घालून प्रथम नियुक्तीचे गांव असलेल्या किवळे या गावाला गडी एकटा निघाला होता.
आईचा लाडका धोंडिबा ,धों.य. खांडभोर (गुरुजी) झाला.ज्ञानदानाचे पवित्र काम प्रामाणिकपणे करीत असताना गुरुजींनी त्यांच्यातील असणाऱ्या संघटन कौशल्याच्या बळावर मावळ तालुक्यातील शिक्षकांची मोट बांधली व ऐंशीच्या दशकात मावळ तालूका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
तेथून पुढे त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठली.गुरुजींच्या या संघर्षप्रवासात त्यांच्या खांद्यावर आई व बहिणींची कौटुंबिक जबाबदारीही होती.
गुरुजींची मोठी बहीण सीताबाई रघुनाथ वाडेकर या माझ्या मोठी चुलती स्वभावाने अतिशय मृदू, शांत व संयमी.
आमची परिस्थितीही त्यावेळी बेताचीच. आमचे मामा खांडभोर गुरुजी त्यांच्या कर्तृत्वाने राजकारण, समाजकारण,सहकारात विविध जबाबदाऱ्या सांभाळून नात्यांची वीण घट्ट जपत होते.भाऊबीजेला मामा आमच्या घरी हक्काने यायचे.बहिणीच्या घरची परिस्थिती मामांना ठाऊक असल्याने मामा माझ्या चुलतीला व माझ्या आईला हाक मारायचे. बाई मी तुझ्या दारात आलोय मला कुंकू लाव.कसलाही बडेजाव नाही, कसलाही पाहुणचार नाही,मामा मोठया आनंदाने ओवाळून घ्यायचे. ओवाळणी म्हणून बहिणींना साडी चोळी द्यायचे.असे अनेक कौटुंबिक प्रसंग आजही डोळ्यासमोर आहेत.
आमच्या कुटुंबातील अनेक अडीअडचणीच्या प्रसंगी मामा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले मी पाहिलंय. बहिणीची जाऊ व बहीण यात काही अंतर असते असे मामांनी कधी जाणवूच दिले नाही.माझ्या आईला अनेक कठीण प्रसंगात मोठ्या भावाच्या नात्याने केलेले सहकार्य आमच्या कायम स्मरणात राहील.अनेक सुखदुःखाचे प्रसंग,अडचणींच्या काळात मामा खंबीरपणे पाठीशी उभे राहिले व दोन्ही परिवारातील पुढच्या पिढीला नाती कशी जपावीत हे शिकविले.मामा हे शिक्षण व शिक्षक संघटना व सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते तर त्याहीपलीकडे जाऊन मामांनी समाजकारणात, राजकारणात अनेक दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
मामांनी विविध क्षेत्रात काम करताना राज्यभर प्रवास केला. रात्री-अपरात्री बुलेटवरून प्रवास करून मुक्कामाला नागाथलीला यायचेच असा मामांचा नित्यक्रम होता.आता मात्र देह थकला होता.मणका विकार बळावला होता.अल्पशः आजाराने चार वर्षापूर्वी त्याचे दुःखद निधन झाले.शिक्षक परिवार व नात्यागोत्यातील खंबीर आधार नाहिसा झाला.यशशिखरावर जात असताना वाटेत सहकार्य केलेल्यांना कधीच विसरायचे नसते.मामांनी अनेकांना यशाची वाट दाखवली.ते सारे त्यांच्या जाण्याने दुःखी झाले होते.
आमच्या मामांच्या म्हणजेच शिक्षक नेते स्व.धों.य.खांडभोर गुरुजी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
(शब्दांकन- श्री.राजू सदाशिव वाडेकर, सर )

error: Content is protected !!