अमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता
मावळमित्र न्यूज विशेष:
निसर्गसंपन्न आंदर मावळ…स्वातंत्र्यपूर्व काळ…मुसळधार पाऊस…उंच उंच डोंगर…हे सगळे सखेसोबती अवतीभोवती असणारे चिमुकले गांव… नागाथली… या गावातील एक गरीब शेतकरी… श्री.यशवंत भिवा खांडभोर. शेती करुन पत्नी सौ.जिजाबाई हिच्यासोबत कौटूंबिक गुजराण करत असताना दोन मुली झाल्यानंतर कुटुंबात एक नवीन पाहुणा आला..१/०८/१९४७ रोजी .या दांपत्याच्या घरी एका चिमुकल्या मुलाचे आगमन झाले..धोंडिबा त्याचे नाव…
होय…तुम्हां आम्हां सर्वांचे आवडते धों.य.खांडभोर गुरुजी…घरची अतिशय हलाखीची परिस्थिती…तुटपूंजी शेती…दीड खणाचं कुडाचं घर…अशा बिकट परिस्थितीत बालपण सरत असतानाच अचानक धोंडीबाच्या डोक्यावरील वडील कै.यशवंत भिवाजी खांडभोर यांचे पितृछत्र हरपले..साऱ्या कुटूंबाची जबाबदारी अचानक आई जिजाबाईवर येऊन पडली.लहानसा चि.धोंडीबा आईला विविध कामात मदत करु लागला.प्रापंचिक जबाबदारीचे भान ठेवून तो गावातल्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवू लागला.
शेतात व घरकामात मदत करुन समाजाचा शैक्षणिक दृष्टिकोन नकारात्मक असतानाही तो वहानगांवच्या बोर्डिंग स्कूलमध्ये सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊ लागला…शाळेत कबड्डी व कुस्ती स्पर्धेत यश मिळवून सर्वत्र नावलौकिक मिळवत होता.सातवीपर्यंतचे शिक्षण वहानगांव येथे पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची सोय संपूर्ण आंदर मावळात नव्हती.शिकण्याची जिद्द असूनही घरची बेताची आर्थिक परिस्थिती व दुरपर्यंत नसलेली शिक्षणाची सोय यांमुळे धोंडीबाच्या जीवनातील शैक्षणिक वाटचाल थांबते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
मुलाने शिकून मोठे व्हावे,ही आईची इच्छा व तत्कालीन जि.प.सदस्य श्री.सावळेराम ( मामा ) सुपे यांनी शिक्षणासाठी वडगांव येथील राहत्या घरात दिलेला मायेचा आधार यांमुळे धोंडीबा वडगांव ( मावळ ) मध्ये माध्यमिक शिक्षण घेऊ लागला.तत्कालीन वडगांव ( मावळ ) चे सरपंच व काँग्रेस नेते श्री.हरकचंद बाफना यांनी ‘खेड्यातील पोरं शिकावीत’ या उदात्त हेतूने विद्यार्थ्यांना वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे धोंडीबासारखी अनेक खेडवळ मुले माध्यमिक शिक्षण घेत होती.खेड्यातला व रानातला धोंडीबा आपले कबड्डी व कुस्तीतील कौशल्य वडगांवमध्येही दाखवत होता.
त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत नावलौकीकही प्राप्त झाला होता…मँट्रीकची परिक्षा उत्तीर्ण होऊन शेतकरी कुटूंबात जन्मलेला धोंडीबा आता ‘गुरुजी’ झाल्याने आई जिजाबाईपुढे गगनही ठेंगणे झाले होते…धोंडिबाच्या थोरल्या बहिनी मथाबाई व सीताबाई या ही धाकट्या भावाच्या यशाने आनंदून गेल्या होत्या.
पायजमा,शर्ट व टोपी असा पारंपारिक मावळी पोशाख परिधान करुन श्री.धों.य.खांडभोर गुरुजी ‘किवळे’ या छोट्याशा खेड्यात अध्यापन करु लागले..नंतर भोयरे,नागाथली व वहानगांव येथे ज्ञानदान करत ज्ञानसेवा केली..अध्यापन करता करता आंदर मावळ दूध व्यावसायिक सहकारी संस्था,वहानगांव येथे सुमारे पाच वर्ष चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. वडेश्वर विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन* म्हणून उल्लेखनीय काम केले…अमोघ वक्तृत्व,उत्तम शेतकरी,दांडगा जनसंपर्क या जमेच्या बाजू असल्याने खांडभोर गुरुजी अल्पावधीत केवळ शिक्षकांमध्येच नाही तर संपूर्ण तालूकाभर लोकप्रिय झाले…वक्तृत्वशैलीमुळे सुप्रसिद्ध असणारे खांडभोर गुरुजी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष झाले.
तत्कालीन मंत्री मा.श्री.मदनजी बाफना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मावळातील विविध शिक्षकांचे प्रश्न सोडवल्याने ‘गुरुजी’ मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक झाले…तद्नंतर त्यांनी अनेकानेक वेळा पतसंस्थेचे चेअरमनपदही भुषविले…नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस मा.श्री.बाफना साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाची’ मुहूर्तमेढ रोवली अन् मावळातील पोरंही शिक्षक झाली पाहिजेत,ही मनेच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकले…१९९० साली लावलेल्या या छोट्याशा रोपट्यात आज हजारो मुले शिक्षण घेत आहेत.
डी.एड् काँलेज व बी.एड् काँलेजमध्ये शिक्षण घेतलेले अनेक छात्रशिक्षक आज महाराष्ट्रभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत… *टाकवे बु,घोणशेत,इंगळून* येथील शाळांमध्ये शिकून अनेकानेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे.राजकीय पाठबळ,अधिकारी वर्गासोबत बोलण्याचे कौशल्य,वक्तृत्वाची विनोदी शैली व शिक्षक कार्यकर्त्यांचे जाळे या विशेषत्वाच्या जोरावर ते अनेक वर्षे *पुणे जिल्हा शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी विराजमान होते.
एरंडवणा येथील शरद अध्यापक विद्यालयाचे अध्यक्ष असताना अनेकोत्तम कामे केल्याने विद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले…चिकाटी,सातत्यपूर्ण काम,शिक्षक हीताची कामे,सहकारातील दांडगा अनुभव या जोरावर खांडभोर गुरुजी *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष झाले. नागाथली सारख्या खेड्यातील मुलगा राज्यस्तरावर शिक्षक नेतृत्व करत असल्याचे पाहून संपूर्ण ‘मावळ प्रांत’ आनंदून गेला.३१ आँगस्ट २००५ रोजी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ‘सेवानिवृत्ती’ स्विकारल्यानंतर गुरुजी पुन्हा एकदा शेती या पारंपरिक व्यवसायाकडे वळले..बैलगाडा शौकीन असणारे गुरुजी संपूर्ण पुणे जिल्ह्यात ‘प्रसिद्ध बैलगाडामालक’ म्हणूनही सुपरिचीत होते.
.त्यांचा अत्यंत आवडता *’मोरा’* नावाचा बैल सर्वत्र प्रसिद्ध होता…शेती,जनावरे हीच आपली खरी श्रीमंती आहे, असे गुरुजींचे मत असायचे…गुरुजी वाचनाचे व्यासंगी होते…’वाचाल तर वाचाल’ असे स्पष्ट मत असणारे गुरुजी सतत वाचनात दंग असायचे…वर्तमानपत्र हे तर त्यांचे जिवलग सोबती होते…पण आता काळ बदलला होता…रात्री अपरात्री ‘बुलेटवर’ नागाथली येथे जाणारा देह आता थकला होता…मणका विकार बळावला होता…आयूष्यभर सतत साथ देणारी *पत्नी सौ.सुमन* पाठीशी खंबीरपणे उभी होती.
पण अचानक काळाने घाला घातला…अल्पशः आजाराने कै.धों.य.खांडभोर गुरुजींचे चार वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले…संपूर्ण आंदर मावळ व शिक्षक समाज गुरुजींच्या जाण्याने हळहळला…शिक्षकहीतदक्ष नेता हरपल्याने अनेकांचे डोळे पानावले होते…
‘नागाथली’ येथील शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या अमोघ वक्तृत्वाच्या या महान शिक्षक नेत्यास तमाम जनसमुदायाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.
(शब्दांकन- श्री.उमेश जनार्दन माळी , सर )

error: Content is protected !!