मावळमित्र न्यूज विशेष:
आंदर मावळातील एकमेव असणा-या जिल्हा लोकल बोर्डाच्या वस्तीगृहात आमचं शिक्षण झालं. बालवयातच आमची गट्टी जमली. अन पुढे आयुष्यभर ही मैत्री टिकली. अगदी श्रीकृष्ण सुदामा सारखी. मोठ्या मनाचा दिलदार मित्र सोडून गेला असला तरी त्याच्या गतकाळातील आठवणी मात्र आजही तशाच ताज्या आहे.
वहानगावच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या वसतीगृहात आंदर मावळाच्या पश्चिम पट्ट्यातील कित्येक मुले शिकत होती. मीही त्यातच वसतीगृहात शिकलो. माझ्या वयाने मोठा असलेला हरजबाबी धोंडिबा यशवंत खांडभोर. माझा बालपणीचा मित्र. येथून आम्ही दोघेही वडगाव मावळच्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकलो. कबड्डी,खो खो ,व्हॉलीबॉल या खेळात पटाईत असलेला हा मित्र उत्तम पट्टीचा कबड्डी खेळायचे.
शिक्षण पूर्ण झाले आणि आम्ही गावी माघारी आलो. धोंडिबा यशवंत खांडभोर,धो.य.खांडभोर गुरुजी म्हणून रुजू झाला. माझा मित्र प्राथमिक शिक्षक झाला. मैत्रीचा हा धागा अधिक समृद्ध होत असताना सोयरीकीचा योग्य जुळून आला होताच. गावागावातील राजकीय मतभेद दूर करायला आमच्या पिढीने पुढाकार घेतला होता.तडजोडीने गावागावातील मतभेद दूर झाले होते. गुण्या गोविंदाने गावे नांदू लागली. धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेस विचारांची आम्ही दोघांही मित्रांनी कास धरली.माझा मित्र गुरूजी झाला होता,खांडभोर गुरुजी या नावाने लोकप्रिय होत असलेल्या मित्राचा मला अभिमान होता.
मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी धो. य.खांडभोर यांची निवड झाली. गाव पातळीवरील तरूण मित्र तालुक्यातील शिकल्या सवरलेल्या पिढीची नेतृत्व करतो,याचा माझ्या इतका आनंद कोणाला नसेल. मीही डाहूली ग्रामपंचायतीचा तरूण सरपंच होतो. माझ्या मित्राचा पहिला सत्कार सोहळा गावात घडवून आणला. माझ्या मित्राला शुभेच्छा देतानाच तो क्षण आजही आठवतोय.
कै.बापू कोंडिबा कुडे,कै.संभाजी चिकणे,कै.रघुनाथ मारूती वाडेकर,कै.किसन भागूजी वाडेकर (पाटील),कै.धोंडिबा पांडुरंग पवार,कै.बारकू विष्णू वाडेकर,कै.रामचंद्र बाबूराव तनपुरे, कै.काळू विठू वाडेकर,कै.नामदेव महादू वाडेकर,यांच्या उपस्थितीत धो. य.खांडभोर गुरुजींचा माझ्या मित्राच्या शुभेच्छांचा सोहळा स्मरणात आहे. त्या पाठोपाठ गुरूजींनी अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळवले. एक मित्र म्हणून मला त्यांचा कायमच आदर वाटला. त्यांनी तितकाच आधार दिला. राजकारणातील चढउतार मी पाहिले,अनुभवले. खांडभोर गुरुजी प्रत्येक वेळी पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. सहकार संस्थेत आम्ही एकत्रित काम केले. कित्येकांना राजकारणातील मानाची पदे मिळवून दिली.पण स्वतःसाठी काही मागितले नाही. आयुष्यभर जपली ती फक्त मैत्री.
गुरूजींचा रूबाब आणि थाट दिवसागणिक वाढत होता. गुरूजी राज्याच्या प्राथमिक शिक्षकांचे नेतृत्व करीत होते.पण त्यांचा पाय जमिनीवर होता. सर्वसामान्य शेतकरी,शेतमजूर यांच्या पासून लोकप्रतिनिधी,अधिकारी यांच्याशी त्यांचा स्नेह होता. त्यातून कित्येकांना त्यांनी केलेली मदत वाखण्या सारखी आहे.शिक्षकांची अनेक शिष्टमंडळे गुरूजीना नागाथली येऊन भेटायची. आपली ग्रा-हाणी मांडायची. समस्या सोडविण्यासाठी साकडे घालायची. गुरूजींनी कायमच शिक्षक वर्गाची पाठराखण केली.त्यांना मदतीचा हात आणि आधार दिला.ते शिक्षक नेते होते.
तसे आंदर मावळातील समस्या सोडविण्यासाठी ते आग्रही होते. स्थानिक माणसांनाही त्यांनी जपण्याचे आणि जोडण्याचे काम केले. माजीमंत्री मदन बाफना साहेब व माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब यांच्या नेतृत्वावर त्यांचा दृढ विश्वास होता. समाजिक प्रश्न ते पोटतिडकीने मांडायचे आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे. सामाजिक प्रतिष्ठा जपताना त्यांनी नाती आणि मैत्री जपली. आमच्या मैत्रीची वीण नात्याच्या पलिकडे जाऊन घट्ट विणली होती. सुख दु:खाचे अनेक प्रसंग आम्ही एकत्रित अनुभवले.ते अनुभव पाठीशी ठेवून माझा जिवाभावाचा मित्र गेला. आमच्या मैत्रीचा हा धागा आमची पुढची पिढी तितक्यातच सहजतेने पेलते,तेही कोणतीच अपेक्षा न ठेवता. मी मागे राहिलो तरी चालेले पण माझा मित्र मागे राहता कामा नये,ही आमची शिकवण आमची पुढची पिढी जपते याचा सार्थ अभिमान मला आहे. आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या माझ्या मित्रालाही असेल.
कै.धो.य.खांडभोर गुरूजी,अनेक प्रसंगात धीर देऊन उभारी देणारा मित्र काळाच्या पडद्याआड गेला. मित्रत्व कसे जपायचे हा धडा खांडभोर गुरूजींनी शिकवला. आणि तोच धडा आज राजू पुढच्या पिढी साठी जपतोय याचा मला अभिमान आहे. मात्र मित्रत्वाचे एक पान माझ्या साठी कोर राहिले.ते आयुष्यभरासाठी कोर राहिले. हा सगळा लेखन प्रपंच अगदी सहज झाला.त्याचे कारण गुरुवार ता.१४ एप्रिल २०२२ला गुरूजींचा पुण्यस्मरण सोहळा आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले .आणि नकळत गुरूजींच्या भूतकाळातील आठवणी उचंबळून आल्या.
(शब्दांकन- श्री. जाखोबा भाऊराव वाडेकर,माजी सरपंच,वहानगांव )

error: Content is protected !!