वाचनवेड संस्थेच्या वतीने लोणावळा परिसरातील ३७ शाळांना अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे वाटप
देहू येथील अभंग प्रतिष्ठाणचा पुढाकार
कार्ला:
पुणे येथील वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून व देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या पुढाकारातून लोणावळा परिसरातील ३७ जिल्हा परिषद शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली.कुसगांव,वेहेरगांव व भाजे केंद्रातील सर्व शाळांचा यात समावेश आहे.
भाजे येथील संपर्क बालग्राम येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे,गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मोरे,शिक्षण विस्तार अधिकारी राजश्री सटवे,शालिनी ढवळे,सचिन कुंभार,प्रा.विकास कंद,अजिंक्य साकोरे,सलीम मुलानी,सुहास विटे,मुकुंद तनपूरे,सुखदेव पथवे,साजन दळवी,नरेंद्र सहाय इ.मान्यवर उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.परंतू अवांतर वाचनासाठी वाचनसाहित्य उपलब्ध होत नाही.वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीट मोरे,मयूर सेठ यांच्या सहकार्यातून सदर पुस्तके सर्व शाळांसाठी उपलब्ध करुन दिली.
चरित्रात्मक पुस्तके वाचल्याने व्यक्ती चारित्र्यवान बनतो.संस्कार ही काळाची गरज असून पुस्तकांचे मानवी जीवनातील योगदान हे अनन्यसाधारण आहे,असे मत संतोष भेगडे यांनी व्यक्त केले.अभंग प्रतिष्ठानने भविष्य काळात स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन द्यावीत अशी अपेक्षा गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी व्यक्त केली.पुस्तकांमुळे माणूस परिपूर्ण बनतो.चारित्र्य व समाजकार्य हीच माणसाची खरी संपत्ती असून त्यासाठी सातत्याने वाचन केले पाहिजे असे विचार प्रा.विकास कंद यांनी व्यक्त केले.नजिकच्या काळात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पुस्तके उपलब्ध केली जातील असे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी जाहीर केले.उत्तम पियानो वादन केल्याबद्दल चि.वेदांत पथवे या विद्यार्थ्याचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद तनपूरे यांनी तर सुत्रसंचालन उमेश माळी यांनी केले.संयोजन संपर्क बालग्राम संस्थेने व आभार अतुल वाघ यांनी मानले.

error: Content is protected !!