वडगाव शहरातील नाल्यावर शेवाळ सहयोगी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण
महाराष्ट्र राज्यात वडगांव नगरपंचायतचा पहिला अभिनव उपक्रम
वडगाव मावळ:
शासनाच्या माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत वडगाव नगरपंचायतीने विविध उपक्रम राबविण्याचे काम हाती घेतले आहेत. याचाच भाग म्हणून वडगाव नगरपंचायत हद्दीतील वैकुंठ स्मशानभूमी परिसरामधील नाल्याचे जैविक पर्यावरण पुनरुज्जीवन पद्धतीने नाविन्यपूर्ण प्रकारे सुशोभीकरण करणे कामास गेल्या एक महिन्यापूर्वी नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. जयश्री बोराडे, उपनगराध्यक्ष पुनम जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार लेम्न्निऑन ग्रीन सोल्युशन कंपनीचे सहसंस्थापक डॉ. प्रसन्न जोगदेव, सोनाली गावडे आणि ऍग्रो माँर्फ सोल्यूशनच्या व्यवस्थापिका डॉ.आकांक्षा आग्रवाल यांनी नाल्याचे जैविक पर्यावरण पुनरुज्जीवन करणे कामाला सुरुवात केली.
नाल्यांचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन, नैसर्गिक रित्या सुशोभिकरण, पाणी स्वच्छता, दुर्गंधी मिटवणे, डासांची पैदास रोखण्यासाठी गप्पी मासे नाल्यात सोडणे व परिसरातील जैवविविधता सुधारणे असे या प्रकल्पाचे फायदे असणार आहेत.
नाल्याची जैवविविधता करण्याचे काम हे सीएसआर फंडातून व लोकसहभागातून श्रमदान करताना तसेच पुण्यातील लेम्न्निऑन ग्रीन सोल्युशन आणि मुबंईतील ऍग्रो माँर्फ सोल्युशन या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.
वैकुंठ स्मशानभूमीतील नाला पुनरुज्जीवन जैवविविधता प्रकल्पाचे काम आज पूर्ण होऊन नाल्यातील सांडपाण्यावर शेवाळ सहयोगी शुद्धीकरण युनिट बसवण्यात आले तसेच स्वच्छ झालेले पाणी ठिबकसिंचनद्वारे कायमस्वरूपी झाडांना सोडण्यात येणार असून शुद्धीकरण युनिट मधील शेवाळाचा झाडांना नैसर्गिक खत म्हणूनही वापर केला जाणार आहे.
या अभिनव प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभागातील उच्च स्तरीय समितीमधील अधिकारी यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी डॉ जयश्री बोराडे, उपनगराध्यक्षा पुनम जाधव, आरोग्य समिती सभापती राहुल ढोरे, नगरसेविका प्रमिला बाफना, डॉ. प्रसन्न जोगदेव, डॉ. आकांक्षा आग्रवाल आणि नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते.
येत्या काही दिवसात हा प्रकल्प पूर्णपणे सौरऊर्जावर सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील घरे, सोसायट्यांमधून नाल्यात पडणारे सांडपाणी, डोंगरातून येणाऱ्या पाण्यासाठी नाल्यात पुरेशी जागा करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह नियमीत राहण्यास मदत होणार आहे. तसेच नाल्यात स्ट्रीम बेड तयार करण्यात आले असून नाल्याजवळील परिसरात लावलेल्या झाडांना शुद्धीकरण युनिट मधील स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

error: Content is protected !!