मावळच्या विकासासाठी आमदार सुनिल शेळके यांची दिल्ली वारी केंद्रीय मंत्र्यांना साकडे
वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील मागील अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह बुधवारी (दि.३०) दिल्ली येथे जाऊन केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेतली आहे.
मावळ विधानसभेतील सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार शेळके नेहमीच आग्रही असतात. तालुक्यात विविध महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी व नागरिकांच्या प्रश्नांवर ते विधानसभेत देखील आक्रमकपणे आवाज उठवत आहेत. आमदार शेळके यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मावळातील मूलभुत व पायाभूत सुविधांसाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. तसेच तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या किचकट प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शेळके सातत्याने प्रयत्न करत आहेत.
त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारे रस्ते, वनविभागाच्या तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विकास कामांच्या परवानग्या मिळविण्यासाठी आमदार शेळके यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
यासंदर्भात आमदार सुनिल शेळके यांनी बुधवारी (दि.३०) दिल्ली येथे जाऊन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील ऐतिहासिक धम्मभुमीच्या जिर्णोद्धाराच्या कामास संरक्षण विभागाकडून परवानगी मिळावी. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सिद्धीविनायक नगरी येथील मंजूर असलेल्या पाणी पुरवठा योजनेस संरक्षण विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळावे. तसेच श्री क्षेत्र देहू ते निगडी पालखी मार्गावर संरक्षण विभागाच्या हद्दीतील रस्ता रुंदीकरणास मंजुरी मिळावी. अशी मागणी केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे आमदार सुनिल शेळके यांनी केली.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन जुना पुणे-मुंबई महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी व वाढते अपघात टाळण्यासाठी सेंट्रल चौक देहुरोड, सोमाटणे फाटा, लिंब फाटा तळेगाव, वडगाव, कान्हे, कार्ला इ.ठिकाणी उड्डाणपूलांची उभारणी होणे गरजेचे आहे. यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडुन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र या प्रस्तावावर अद्यापपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या महत्त्वपूर्ण विषयावर संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरुन योग्य ते आदेश द्यावेत,अशी मागणी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार शेळके यांनी केली.
तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेऊन मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्रमांक ४ मधील कल्हाट, निगडे ही गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळावीत, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून १३ डिसेंबर २०२१ रोजी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला होता.तरी या प्रस्तावाचा विचार करुन ही गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधुन वगळण्यात यावी,अशी मागणी आमदार शेळके यांनी केली आहे.
आमदार सुनिल शेळके यांनी तिन्ही विभागांकडे केलेल्या मागण्यांबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या दिल्ली दौऱ्यात आमदार सुनिल शेळके यांनी खासदार शरदचंद्र पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मावळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा व दिल्ली येथे पाठपुरावा सुरू असलेल्या कामांची माहिती खासदार पवार यांना दिली. या प्रलंबित कामांचे गांभीर्य समजून घेऊन खासदार शरदचंद्र पवार यांनी त्वरित संबंधित मंत्रीमहोदयांना पत्र व्यवहार देखील केला आहे.

error: Content is protected !!