पंडित नेहरू विद्यालय, कामशेत केंद्राची दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण.
कामशेत:
पंडित नेहरू विद्यालयाच्या परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा तणावमुक्त व कॉपीमुक्त असणार आहे.परीक्षा केंद्रामध्ये कोविड -१९ चे सर्व नियम पाळून परीक्षा घेतली जाणार आहे. या केंद्राला संलग्न सात उपकेंद्र असणार आहेत. मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा होणार आहे.
मंगळवार दिनांक १५ मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू होत असून परीक्षेच्या नियोजना संदर्भातील बैठक नुकतीच पंडित नेहरू विद्यालयात पार पडली.
पंडित नेहरू विद्यालय कामशेत या मुख्य केंद्रात ३४० परीक्षार्थी प्रविष्ट असून, केंद्राला संलग्न सात उपकेंद्रे आहेत. उषाताई लोखंडे चॅरीटेबल ट्रस्ट माध्यमिक विद्यालय, सांगिसे २३ परीक्षार्थी, एकविरा माध्यमिक विद्यालय, कार्ला ७७ परीक्षार्थी,गोल्डन ग्लेज माध्यमिक विद्यालय, करंजगाव ११० परीक्षार्थी, महर्षी कर्वे आश्रम शाळा, कामशेत ४० परीक्षार्थी, जैन इंग्लिश स्कूल, कामशेत ५८ परीक्षार्थी, व्ही. आय. टी. कॉलेज, खामशेत ३४ परीक्षार्थी, जिझस हायस्कूल, खामशेत २७ परीक्षार्थी, असे एकूण ७०९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
केंद्र संचालक प्राचार्य अजिनाथ ओगले म्हणाले, “यावर्षी परीक्षेसाठी बोर्डाने अर्ध्या तासाचा वेळ वाढवून दिला आहे. प्रश्नपत्रिकेचा संच विद्यार्थ्यांसमोर उघडण्यात येणार असून, प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ दिला आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला असून, उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका असणार आहे.” त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व कॉपी विरहित परीक्षेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!