नवलाखउंब्रे ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच
मावळमित्र न्यूज विशेष:
नवलाखउंब्रे मावळ तालुक्यातील औद्योगिकनगरी.या नवलाखउंब्रे ग्रामपंचायतीच्या पहिला महिला सरपंच होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या चैताली पांडुरंग कोयते. पहिल्या महिला सरपंच ही बिरुदावली त्यांना
कायमच राहिल. शिवाय शब्दाला जागणा-या आणि दिलेला शब्द पाळणाऱ्या वचननिष्ठ महिला सरपंच हा किताब त्यांच्या नावापुढे कायमच अधोरेखित केला जाईल. राजकारणात दिलेला शब्द पाळयचा असतो हे सिद्ध करणा-या चैताली यांच्या या निर्णयाचे गावक-यांकडून स्वागत केले जात आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत चैताली पांडुरंग कोयते नवलाखउंब्रे ग्रामपंचायतीत बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्या. एक वर्षांनंतर सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागेल हा दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि राजीनामा दिला. सरपंच पद जितक्या आनंदाने मिळाले तितक्याच समाधानाने त्यांनी ते सोडले. या सर्व घटनेच्या पाठीशी कोयते परिवाराचे संस्कार आणि वैचारिक बैठक महत्वाची आहे. वारकरी सांप्रदायातील ह.भ.प.बबूशा बबनराव कोयते आणि लक्ष्मीबाई बबूशा कोयते यांची सूनबाई असलेल्या चैताली सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटूंबातील कन्या आहे
चैताली पाचाणे येथील शेतकरी कुटुंबातील कन्या. त्यांचे वडील शांताराम येवले तळेगाव दाभाडे शहरात राहून टेल्को कंपनीत नोकरी करीत तर आई कुंदा शांताराम येवले गृहिणी. महाविद्यालयीन शिक्षण झालेल्या चैताली कोयते परिवारात रमून गेल्या. नवलाखउंब्रेतील प्रतिष्ठित कुटूंब असलेल्या कोयते परिवाराने सूनचे थाटमाट केला. कोयते परिवार गावातील राजकीय व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला परिवार. हनुमंत कोयते गावचे उपसरपंच. त्यांच्या कुटुंबातील चैताली. पांडुरंग कोयते व्यवसायात नाव कमावलेला तरूण. त्यांनाही राजकीय इच्छाशक्ती.याच इच्छाशक्तीच्या बळावर गत वर्षी झालेल्या निवडणुकीत पत्नी चेताली यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.
यासाठी गावक-यांनी साथ दिली. मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाला . ग्रामपंचायत स्थापनेपासून अनेक दिग्गजांनी गावचे सरपंच भूषविले. राजकारणाची ही पहिली पायरी चढून गेलेल्या कित्येकांनी तालुक्यातील राजकारणावर आपला प्रभाव पाडला. ग्रामपंचायत स्थापनेपासून उपसरपंच पदावर महिलांना संधी मिळाली. परंतू सरपंच पदाचा बहुमान मिळवणा-या चैताली ताई पहिल्याच. राजकारणावर येण्यापूर्वी कुटुंबिय आणि कुटूंबातील सुख दु:ख,व्यवसाय हेच त्यांचे आयुष्य होते.
सरपंच पदाचा बहुमान मिळाल्यावर पती पांडुरंग कोयते यांच्या पाठिंब्यावर विकासाची गंगोत्री खेचून आणण्यासाठी त्या राबत राहिल्या. यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. सरपंच पदी निवडून आल्या पासून सरपंच पदाचा राजीनामा देई पर्यत त्यानी दहा कोटी तीस लाख रूपयांची विकास कामे त्यांनी खेचून आणली. यांतील कित्येक कामे प्रगतीपथावर आहे. कित्येक कामे पूर्ण झाली असून काही कामांची भूमीपूजने झाली आहे. राजकारणातील खुर्ची काही कोणाची मक्तेदारी नाही. मिळालेली मानाची खुर्ची ही जनसेवे साठी आहे,हे उमगलेल्या चैताली यांनी विकास कामाला प्राधान्य तर दिले.
शिवाय गावासमोर दिलेला शब्द पाळला यातच त्यांचे मोठेपण खूप काही सांगून जाते. राजकारणातील सत्ता ही डोक्यात घालून मिळवण्यासाठी नाही तर डोक्यावरती बर्फ ठेवून काम करण्यासाठी आहे.याचे साधे गमक या ताईनी समजून घेतले आणि त्या दृष्टीने पाऊले टाकली. जेव्हा कधी गावच्या राजकारणाचा ईतिहास मांडला जाईल तेव्हा चैताली ताई यांच्या कर्तबगारीची चार अक्षरे लिहूनच तो पूर्ण होईल.लवकच जगाच्या नकाशावर ठळकपणे उमटणा-या नवलाखउंब्रे ग्रामपंचायतीची वाहवा राज्यभर होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना. गावच्या इतिहासात पहिल्या महिला सरपंच पदाची माळ गळ्यात असणा-या चैताली पांडुरंग कोयते यांना पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा..

error: Content is protected !!