लोकसेवेचा वसा व वारसा लाभलेला युवक नेता
‘पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा इतका विश्वास तितकीची साथ द्या’
मावळमित्र न्यूज विशेष:
लोकसेवेचा वसा अन वारसा पाठीशी असलेल्या बळीराम राणूजी भोईरकर या तरूण सरपंचाने भोयरे गावचे नाव जिल्ह्यात झळकवले.भोयरे ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच पदाचा बहुमान ही या तरूण सरपंचाला जातो.
गेल्या पन्नास वर्षाच्या लोकसेवेचा वारसदार ठरलेल्या बळीराम राणूजी भोईरकर या नावाच्या पाठिशी लोकनेते स्व. राणूजी ठमाजी भोईरकर यांच्या नावाचे मोठे वलय पाठीशी आहे.या वलयाला जागत भोईरकर बंधूंनी लोकसेवेची ही कास हाती धरली.थोरला बंधू बाजीराव याने शिक्षणाची कास धरीत शैक्षणिक प्रवाहात स्वतःला झोकून दिले.
तर बळीराम भोईरकर यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवीत लोकसेवेला महत्व दिले .तेही आपली पारंपारीक शेतीवाडी आणि व्यवसाय संभाळून.भाताच्या साळी भरडून तयार झालेल्या मावळचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ राज्यभर पोहचण्याची तळमळ या तरूण उद्योजकात आहे.या साठी सा-या कुटुंबाचे पाठबळ पाठीशी आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.कुटूंबाचा डामडौल संभाळून लोकसेवेचे व्रत अंगी बाळगायला हे बाळकडू रक्तात असावे लागते.
जे बाळकडू बळीराम भोईरकर यांना जन्मजात आहे.कै.राणबा भोईरकर भोयरे गावचे तीस वर्षे सरपंच होते.पुढची पाच वर्षे ते पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक होते. पस्तीस वर्षाच्या राजकारण आणि समाजकारणात भोयरे गावांसह आंदर मावळात आदराचे स्थान कै.राणबा भोईरकर यांनी मिळवले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय भोयरे गावात सुरू झाले.इवलेसे रोप लावलेल्या या शाळेचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्षात पोहचला आहे.
एकसंघ गाव आणि एकसंध आंदर ही त्यांची व्यापक भूमिका तरूण पिढीचे नेतृत्व करणा-या पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक आहे.
असे बाळकडू लाभलेले भोयरे ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बळीराम भोईरकर यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायत सदस्य पदापासून झाली. सदस्य,उपसरपंच,प्रभारी सरपंच अशी पदे भूषवित बळीरामजी मागील पंचवार्षिक निवडणुकीत जनतेतून निवडून आले. त्यांच्या नावापुढे प्रथम लोकनियुक्त सरपंच पदाचा बहुमान आपसूक लागला.
या काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल गाव पातळीवरून,तालुका,जिल्हा आणि राज्य पातळीवर घेतली गेली.
महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आर.आर.पाटील सुंदर गाव हा मानाचा किताब गावाने पटकावला. या पुरस्काराने अजून एक मानाचा तुरा भोयरे गावच्या इतिहासात अधोरेखित झाला. या सारख्या अनेक पुरस्कार गावाला मिळाले. आंदर मावळातील राजकिय इतिहासात भोयरे गावच्या इतिहासाला अधिक महत्व आहे. हे राजकीय महत्व कै. राणबा भोईरकर यांच्या पुढाकारातून मिळाले. हेच राजकीय महत्व पुढे गावातील सर्वच लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी जपले गेले.
आणि सरपतच बळीराम भोईरकर यांनी या इतिहासात अधिक भर घातली. यासाठी त्यांना सा-या गावाने साथ दिली. ग्रामीण भागातील नेतृत्व अधिक सक्षमपणे करता येईल इतकी क्षमता असलेल्या या तरुण मित्राला पाठीवर हात ठेवून फक्त ‘लढ ‘म्हणा इतका विश्वास देण्याची आणि तितकीची साथ देण्याची गरज आहे.

error: Content is protected !!