मावळमित्र न्यूज विशेष:
साधारणतः पुरूषाच्या मागे कणखर स्त्री असते या आशयाची बिरुदावली आपणाला ठाऊक आहे.पण पुरूषही पत्नीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपवून तिला शिकवून सवरून सन्मानाच्या उंचीवर घेऊन जातो हाही इतिहास अधोरेखित आहे.आपल्या सर्वाचे श्रद्धास्थान महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवून देशातील पहिली महिला शिक्षिका केली.
या इतिहासाची पुनरावृत्ती आज आपल्या आजूबाजूला चौफेर पहायला मिळेल. विशेषतः प्राथमिक शिक्षकांच्या मांदियाळीत शिक्षक पतीने पत्नीला शिकवून शिक्षिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेच एक दांपत्य मावळ तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मस्तूद गुरूजी आणि मस्तूद बाई. आज मंगल बब्रुवाहन मस्तूद यांचा सेवानिवृत्त सोहळा आहे.
आयुष्यभराच्या सेवेचा लेखाजोखा मांडण्याचा दिवस.ज्याच्याकडे पाहत आणि ज्यांची नावे ऐकत कित्येक पिढ्या शिकल्या सवरल्या,त्या गुरूजनांच्या मांदियाळीत मस्तूद गुरूजींचे नाव. अन त्याच जोडीने मस्तूद बाईंचे नाव खेडोपाडी सर्वश्रुत नाव.
मस्तूद बाईचे बालपण खडतर प्रवासाने सुरू झाले. खडतर प्रवासाने सुरू झालेला प्रवास पुढे सुख,समाधान कारक सुरू याचा आम्हाला आनंद आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कमलादेवी ग्रामदैवत असणाऱ्या करमाळा हे त्यांचे जन्म गाव.वडील ज्ञानोबा व आई आवडाबाई. सुधाकर,दत्तात्रय व नंदकूमार भाऊ. बहिण भावाच्या प्रेमात तसूभर फरक नाही. लेकीला आणि लेकांना कष्टाची आणि प्रामाणिक पणाच्या शिकवणीचे बाळकडू जन्मजात लाभलेले.
वडिलांनी चप्पल शिवण्याचा व्यवसाय,एका आईने धुणीभांडी तर दुसऱ्या आईने वीट तयार करण्याचे काम करुन मुलांचे पालनपोषण केले. मंगल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण करमाळा येथे झाले घरची जबाबदारी असल्याने दहावी अनुत्तीर्ण झालेल्या मंगल यांचा श्री.बब्रुवाहन मस्तूद सर यांच्याशी विवाह झाला अन् मंगल कांबळे सौ.मंगल मस्तूद झाल्या.
प्रपंच करता करता १९८८ त्यांनी एस.एस.सी चे शिक्षण पूर्ण केले.मावळ तालुक्यातील ‘वाऊंड’ या लहानशा खेड्यात राहून तीनही अपत्यांचा सांभाळ करुन पुढील शिक्षण घेण्याची जिद्द दाखवली.प्रचंड कष्ट व परिस्थितीशी जुळवून घेत डी.एडच्या शिक्षणासाठी सोलापूर येथील शिवाजी अध्यापक विद्यालय,विजापूर रोड गाठले ह
मस्तूद गुरूजी मावळ तालुक्यात शिक्षक,तीन अपत्ये व मॅडमचे डी.एडचे शिक्षण सोलापूरात.जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास व ध्येय गाठण्याचा ध्यास यामुळे बाईचे १९९१ मध्ये डी.एड पूर्ण झालेदि.१८/०७/१९९२ रोजी ‘शिक्षकी पेशाची’ नोकरी लागली. इंदोरी,आंबी,नवलाख उंबरे,सांगिसे व निगडे या सर्व ठिकाणी आपण अत्यंत प्रामाणिकपणे नोकरी केली.शांत,संयमी स्वभाव,सहकार्यशील वृत्ती यांमुळे सर्व शिक्षकांशी आपले नेहमी सद्वर्तन राहिले.उपक्रमशील व विद्यार्थीहीतदक्ष असल्याने आपले अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावारुपाला आलेले आहेत,आपला विद्यार्थी असल्याचा अभिमान बाळगून मिरवणारे अनेक विद्यार्थी आज अवतीभवती आहे.
.शिक्षण,राजकीय,कृषी तसेच गृहबांधणी क्षेत्रात कार्यरत असणारे आपले अनेक माजी विद्यार्थी अजूनही तुमचा चरणस्पर्श घेतात ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
मस्तूद बाईचा एक मुलगा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे तर दुसरा उत्तम मँकँनिकल इंजिनियर आहे.
कन्येने जी.डी आर्टचे शिक्षण झालेले असून ती विविध कलांमध्ये पारंगत आहे. प्रामाणिकपणे काम केल्याने व विद्यार्थ्यांनी दिलेल्या दुव्यामुळे आपले कुटुंब ‘सुखी’ आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आज सेवानिवृत्तीदिन.गेल्या अडीच तपाच्या सेवेचा अखेरचा दिन.प्रचंड कष्ट व यशाचा ध्यास उराशी बाळगून अपयशाचे रुपांतर यशामध्ये करुन अनेकानेक विद्यार्थी घडवणारा तुमचा हा शैक्षणिक प्रवास खरचं थक्क करणारा आहे.अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आपल्या जीवन प्रवासाला आम्हा सर्वाकडून लाखाभर शुभेच्छा.
(शब्दांकन: संतोष भांगरे,अध्यक्ष शाळा समिती निगडे)

error: Content is protected !!