शिक्षक नेते राजू लक्ष्मणराव भेगडे जन्मदिन विशेष
मावळमित्र न्यूज विशेष::
पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारा निसर्गरम्य मावळ तालुका म्हणजे सौदर्यांची खाणच..उंच उंच डोंगर,पांढरेशुभ्र धबधबे,हिरवागार परिसर व विस्तीर्ण जलाशय हे येथील सुंदरतेला अधिकच मनमोहक बनवतात…या मावळ तालुक्यातील हवेली सीमेवर असणारे गांव म्हणजे शेलारवाडी.
एका बाजूला घोरावडेश्वर डोंगर व पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग तर दुसऱ्या बाजूस पवित्र इंद्रायणी नदी यांच्या मधोमध असणारे हे गांव देहूरोड कँन्टोंमेंट बोर्ड हद्दीत येते.संरक्षण क्षेत्र परिसरात असल्याने या गावचे क्षेत्रफळ जरी कमी असले तरी लोकसंख्येच्या दृष्टीने मात्र ते मोठेच आहे.शेलार,भेगडे,माळी या प्रमुख आडनावांसह इतर सर्वजण येथे गुण्या-गोविंदाने राहतात…याच गावात भेगडे परिवारातील एका गरीब कुटुंबात २५ जानेवारी १९७५ रोजी एका मुलाचा जन्म झाला…होय..राजू लक्ष्मणराव भेगडे असे त्याचे नाव…
घरात सर्वांत थोरला असणारा राजू इ.तिसरीत असताना वडील कै.लक्ष्मणराव धोंडिबा भेगडे यांचे अकाली निधन झाले.न समजण्याच्या वयात आयुष्यभर लक्षात राहणारी घटना घडल्याने तिचा परिणाम चि.राजूवर झाला.तीन मुले व एक मुलगी पितृप्रेमास दुरावल्याने घराची संपूर्ण जबाबदारी आई श्रीम.गोदावरी यांच्यावर येऊन पडली.
स्वतःच्या व इतरांच्या शेतात मोलमजूरी करुन आई मुलांना सांभाळत होती..राजू ने प्राथमिक शिक्षण श्री.स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा,शेलारवाडी येथे पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी श्री.शिवाजी विद्यालय,देहूरोड येथे प्रवेश घेतला..शेलारवाडी ते देहूरोड हा प्रवास ‘सायकल घेण्याची ऐपत नसल्याने’ त्याला पायीच करावा लागायचा..सर्वच बाबतीत प्रतिकुल परिस्थिती असताना मोठ्या जिद्दीने उपजत हुशारीच्या जोरावर राजू दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला अन् आई श्रीम.गोदावरी यांना गंगेत न्हाल्यासारखे वाटले.
दहावीनंतर कॉलेजला जावे असे राजूला सातत्याने वाटायचे.परंतू तत्कालीन शिक्षक व गुरु कै.द.ना.माळी गुरुजी यांचा सल्ला घेतल्याशिवाय राजू कोणताही निर्णय घेत नव्हता.
कै.माळी गुरुजींनी डी.एड् ला जाण्याचा सल्ला दिला व अँडमिशनसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींसाठी साहाय्य केले.परंतु राजू जवळ डी.एड्ची फी भरण्यासाठी आवश्यक पैसे उपलब्ध नव्हते.चुलते कै.तुकाराम धोंडिबा भेगडे यांनी त्याच्या डी.एड्च्या शिक्षणाची संपूर्ण फी भरली अन् तो हरकचंद रायचंद बाफना डी.एड् काँलेजमध्ये छात्रशिक्षक झाला..आत्मविश्वास,जिद्द,चिकाटी व प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर डी.एड् काँलेजमध्येही त्याने आपली छाप पाडून उत्तम गुण मिळवले.
या गुणांच्या जोरावर जि.प.प्रा.शाळा,सुदुंबरे येथे त्याला शिक्षक म्हणून नोकरी लागली अन् शेलारवाडी गावचा राजू हा फक्त राजू न राहता तो श्री.राजू भेगडे सर झाला.मुलाला लागलेल्या शासकीय नोकरीने आईसह सर्व कुटुंबीय अत्यानंदीत झाले..सुमारे एक तपाच्या सुदुंबरे येथील सेवेत भेगडे सरांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले.कित्येक जणांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला.
शिक्षण,बँक,राजकीय क्षेत्रात त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.दरम्यानच्या काळात फत्तेचंद जैन संस्थेत अध्यापिका असणाऱ्या चव्हाण कुटुंबातील योगिता यांचे त्यांना स्थळ आले अन् दोघांच्या जीवनातील यशाचा ‘राजयोग’ सुरु झाला.नवलाख उंबरे,पुसाणे,शिवणे व आता मळवंडी ढोरे या शाळांमध्ये त्यांचा शालेय वेळ तंतोतंत पाळण्याचा शिरस्ता कायम राहिला.
वक्तशिरपणा हा सध्याच्या काळात दुरापास्त झालेला गुण हे भेगडे सरांच्या यशाचे गमक ठरले..विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अध्यापन करणे,विविध शालेय उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची कौशल्ये विकसित करणे या विशेष गुणांमुळे ते विद्यार्थीवर्गाला कमालीचे आवडू लागले..’विद्यार्थी हेच दैवत’ हे मानण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना आजतागायत मावळ तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार,शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार,राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार इ.पुरस्कार प्राप्त झाले.
विद्यार्थी हीत साधता साधता शिक्षकांचे प्रश्नही सोडवावेत या उदात्त हेतूने ते कै.धों.य.खांडभोर गुरुजी व श्री.वि.म.शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस झाले.निष्कलंक चारित्र्य,गोड स्वभाव व प्रभावी नेतृत्वगुण यांच्या माध्यमातून २००६ व २०११ या दोन्हीही पंचवार्षिक निवडणूकीत प्रचंड यश मिळवून ते मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक झाले.
पुढे एकविसाव्या शतकात ‘दोनदा चेअरमन’ होण्याचा मान ज्या मोजक्याच संचालकांना मिळाला त्यातही त्यांनी स्थान पटकावले.थकबाकीदारांची केलेली वसूली व पारदर्शक कारभार यामुळे ते शिक्षक वर्गात अजूनही लोकप्रिय आहेत.पुणे जिल्हा शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख तसेच मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते या दोन्ही पदांना न्याय देताना ते सतत शिक्षक हीताचाच विचार करत असतात…
राजू भेगडे सर यांच्या पत्नी योगिता या गुरु गणेश प्राथमिक विद्या मंदिर येथे मुख्याध्यापिका असून सरांच्या यशामध्ये पत्नीचा महत्वपूर्ण वाटा आहे,असे ते सातत्याने सांगतात.त्यांची कन्या मधुरा ही विवाहीत असुन तिने एम.बी.ए चे शिक्षण पूर्ण केले आहे.तर मुलगा हर्षल हा सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे.किक बॉक्सिंग व कराटे यांमध्ये त्याने प्राविण्य मिळवले असून या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक संपादन केलेला आहे..त्यांचे बंधू संजय,गणेश,आई श्रीम.गोदावरी,बहीण नुतन,दाजी स्वामी येळवंडे,मेहुणे योगेश चव्हाण या सर्वांची व त्यांच्या कुटुंबियांची प्रामाणिक साथ हेच भेगडे सरांच्या यशाचे गमक आहे..श्री.अमरदेवी माता,श्री.कुंडदेवी माता,श्री.घोरावडेश्वर व पंढरीच्या विठूरायाचा आशिर्वाद हे सर्व सरांच्या पाठीशी असल्याने ‘सुखी’ परिवार म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते.
शेलारवाडी गावातील विविध धार्मिक कार्यात ते हिरीरीने सहभागी होतात.माजी आमदार श्री.दिगंबरदादा भेगडे यांच्यातील प्रामाणिकपणा हा गुण त्यांना नेहमी भावतो.देहुरोड कँन्टोंमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष श्री.अशोक शेलार व अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.लहू शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ते श्री.अमरदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ञ संचालक व श्री.अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे संचालक आहेत.
आज मिळालेले सर्व सुख आईची मेहनत व पत्नीने केलेल्या त्यागामुळे प्राप्त झाले आहे हे अधोरेखित करताना त्यांच्या कुटुंबातील एकी दिसून येते..
आज २५ जानेवारी…शिक्षक नेते श्री.राजू लक्ष्मणराव भेगडे सरांचा जन्मदिन…यशाची उंच शिखरे प्राप्त झाली तरीही पाय जमिनीवर असणाऱ्या व विद्यार्थी हीतासाठी सातत्याने झटणाऱ्या आमच्या या वडीलबंधूस उदंड आयुष्याच्या अनेकोत्तम शुभेच्छा !!!
( शब्दांकन- उमेश जनार्दन माळी, सर शेलारवाडी)

error: Content is protected !!