माझ्या मावळची सावित्री…..
खांडी,माळेगांव,चांदखेड,शिवणे असो अथवा गोवित्री
गोरगरीबांच्या लेकरांना घडवते माझ्या मावळची सावित्री
पोटच्या पोराप्रमाणे ती सर्व विद्यार्थ्यांना शिकवते
माळरानावर कष्ट घेऊन हिरवं रानं पिकवते
अज्ञानाचा अंधकार दूर करत देते यशाची खात्री
गोरगरीबांच्या लेकरांना घडवते माझ्या मावळची सावित्री
कोरोनाकाळात ती घरोघरी करायची सर्वेक्षण
शिक्षणात खंड नको म्हणून अॉनलाईन द्यायची शिक्षण
विद्यार्थीहीत जोपासण्या स्व-सुखाला लावते कात्री
गोरगरीबांच्या लेकरांना घडवते माझ्या मावळची सावित्री
सुलेखन,पाढे पाठांतर देते कलागुणांना नेहमी प्रोत्साहन
वर्गातल्या देवांना शिकवताना प्रसन्न असते तिचे मन
आनंदवृत्तीने साजरी करते दहीहंडी असो अथवा नवरात्री
गोरगरीबांच्या लेकरांना घडवते माझ्या मावळची सावित्री
कळसूबाई,वासोटा,विसापूर तिही जीवन जगते कर्तुत्वाने
अनेक सावित्री घडल्यात या सावित्रींच्या नेतृत्वाने
तिच्यामुळेच जग सारे मग पोटात का मारते जन्मदात्री?
गोरगरीबांच्या लेकरांना घडवते माझ्या मावळची सावित्री
देशातील प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…
महिला मुक्ती दिन व महिला शिक्षण दिनाच्या सर्व नारीशक्तीला अंतःकरणपूर्वक शुभेच्छा…
बालिका दिनाच्या अनेकोत्तम शुभेच्छा…
लेक वाचवा…लेक शिकवा..
( शब्दांकन – उमेश जनार्दन माळी, सर)

error: Content is protected !!