कशाळ:
पंचायत समिती, मावळ आणि ग्रुप ग्रामपंचायत कशाळ – किवळे यांच्या संयुक्त विद्यमाने शबरी घरकुल योजने अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांच्या गृह प्रवेशाचा समारंभ आयोजित केला होता. सगळ्यात जास्त घरकुले आणि सर्वात उत्तम घरकुल या दोन्हींसाठी ग्रामपंचायतीला द्वितीय मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे साहजिकच अभिमानाची बाब होती. सदर योजना राबवताना ज्या हातांनी कष्ट घेतले त्यांचे ऋण जन्मभराचे राहणार आहे.
अन्न, वस्त्र, आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी निवारा ही अत्यंत आवश्यक असणारी गरज जर पूर्ण होत असेल तर लाभार्थ्यांचा आनंद गगनात न मावणारा असतो. गरजू कुटुंब निवडून त्याला लाभ मिळवून देण्यास प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. आपलं स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचेच स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहींना आयुष्यभर कष्ट करावं लागतं.


हेच घराचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शासन आपल्या परीने यथाशक्ती प्रयत्न करत असते. शासनाच्या मदतीचा हातभार हा सामान्यांसाठी लाख मोलाचा ठरतो. आपल्या घराचं स्वप्नं पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो.
एखाद्या कुटुंबाची आयुष्यभराची गरज भागवल्याचे समाधान हे त्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही असते, जे मनापासून पाठपुरावा करत असतात.
असाच काहीसा अनुभव मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला.
मावळ पंचायत समितीचे जवळपास सगळेच अधिकारी आणि पदाधिकारी या समारंभाला उपस्थित होते. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हीच, त्यांच्या कामाची पोचपावती होती.
घरकुल गृहप्रवेश समारंभाच्या निमित्ताने मावळ पंचायत समितीच्या विद्यमान सभापती आदरणीय सौ. ज्योतीताई शिंदे, माजी सभापती श्री. गुलाबकाका म्हाळसकर, माजी उपसभापती श्री. शांताराम बापू कदम, भक्ती शक्ती युवा मंचाचे अध्यक्ष श्री. रवीभाऊ शेटे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय श्री. सुधीरजी भागवत, विस्तार अधिकारी सौ. भूमकर मॅडम, केंद्रप्रमुख श्री. भांगरे सर, श्री. केदारी सर, महिला बचत गट तालुका प्रमुख श्री. सुभाषजी गायकवाड सर, ग्रामपंचायत चे सर्व माजी पदाधिकारी, किवळे गावचे पोलीस पाटील श्री. राजारामजी पिंगळे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारिणी, तसेच मौजे कशाळ व किवळे गावच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्व लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. ज्योती शिंदे आणि प्रमुख अतिथींनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन केले. विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आणि माजी सरपंच सौ. मनिषा पिचड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.


विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. सविता मदगे, सौ. आशा सुभाष जाधव, सौ. बिजाबाई जाधव, आणि सरपंच मारुतीराव खामकर यांनी आलेल्या पाहुण्यांना सन्मानित केले. पाहुण्यांच्या आणि लाभार्थ्यांच्या मनोगतानंतर ग्रुप ग्रामपंचायत कशाळ – किवळे चे विद्यमान सरपंच श्री. खामकर सर यांनी आभार व्यक्त करून प्रत्यक्ष गृहप्रवेशाचा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच श्री. तुळशीराम जाधव यांनी केले.
समारंभाची सांगता पिठलं भाकरीने झाली. महिला बचत गटाच्या महिलांनी सुरेख अशी पिठलं भाकरीची मेजवानी पाहुण्यांना दिली. घरकुलातील पिठलं भाकरीची चव खरंच फार न्यारी होती.गृहप्रवेशाचा हा आनंदोत्सव एक आगळा वेगळा अनुभव देणारा होता.

error: Content is protected !!