मावळमित्र न्यूज विशेष:
स्वातंत्र्यपूर्व काळ…१९ वे शतक…एकीकडे परकीय इंग्रज देशावर अन्यायकारक राज्य करत होते तर दुसरीकडे देशातील जनता अज्ञान,अंधश्रद्धा यांमध्ये आकंठ बुडाली होती.
याच संघर्षमय काळात इ.स.१८२७ मध्ये सातारा जिल्ह्यातील ‘कटगुण’ या ठिकाणी महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म झाला…इ.स.१८३४ ते इ.स.१८३८ या कालावधीत त्यांनी पंताजींच्या शाळेत आपले शिक्षण पुर्ण केले…पुढे वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा सावित्रीबाईंशी विवाह झाला…या कालखंडातील समाजाला शिक्षणाचे महत्त्व फारसे समजले नव्हते…अज्ञानाचा अंधकार सर्वत्र पसरला होता…अशा या नकारात्मक काळात महात्मा फुले यांनी मात्र ‘शिक्षण घ्यायचेच’ असे मनाशी ठरवले..इ.स.१८४१ ते इ.स.१८४७ या काळात त्यांनी ‘स्काँटिश मिशन हायस्कूलमध्ये’ इंग्रजी शिक्षण घेतले..तद्नंतर दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेऊन थाँमस पेन यांच्या ‘राईट आँफ मँन’ या ग्रंथाचा अभ्यास केला..
इ.स.१८४८ मध्ये मित्राच्या विवाहाच्या मिरवणूकीत उच्चवर्णियांकडून अपमान झाल्यानंतर त्यांनी बहूजनांसाठी काहीतरी करायचेच ही खूणगाठ मनाशी बांधली…बहूजन समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी १८४८ मध्ये पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली अन् खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली..इ.स.१८५२ मध्ये त्यांनी ‘पुणे लायब्ररीची’ स्थापना केली..आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना शिकवले…व तद्नंतर त्या मुलींच्या शाळेत अध्यापन करु लागल्या..महात्मा फुलेंचे हे कार्य बघून तत्कालीन उच्चभ्रु जातीच्या लोकांनी मारेकरी घालून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला…सावित्रीबाईंच्या अंगावर दगड-धोंडे,चिखल,शेण फेकण्यात आले..परंतू मुलींच्या व बहूजनांच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या या महान विभूतींवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही…इ.स.१८५५ मध्ये त्यांनी रात्रशाळा सुरु केली..शिक्षणाशिवाय दारिद्रय व अंधश्रद्धा दूर होणार नाही,असे त्यांचे मत होते..’विद्ये विना मती गेली,मतीविना निती गेली,निती विना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्तविना शुद्र खचले अन् इतके अनर्थ एका अविद्येने केले,असे ते म्हणायचे…त्यांनी विधवा विवाहास सहकार्य केले…विधवांच्या ‘केशवपन’ या अनिष्ट चालिरितीविरुद्ध आवाज उठवला..सत्य हे अढळ असते..शेवटी सत्याचाच विजय होतो,या मताशी ते ठाम असायचे..अस्पृश्यांनी दिली जाणारी दुय्यम वागणूक त्यांना सहन होत नव्हती..त्यांनी बहूजनांसाठी आपला पाण्याचा हौद खुला केला..इ.स.१८६३ मध्ये त्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृहाची’ स्थापना केली..इ.स.१८७३ मध्ये जनहितासाठी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली..सत्यशोधक समाजातर्फे नवीन पुजाविधी व मंगलाष्टकाची रचना करुन पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली…अज्ञानाने बरबटलेल्या समाजात यामुळे क्रांती घडत होती…
महात्मा फुले हे कर्मकांडास विरोध करत होते..जातीभेद तर त्यांना मान्यच नव्हता..अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क नाही ही बाब त्यांना सातत्याने खटकत असायची..म्हणूनच त्यांनी अविरत प्रयत्न करुन बहूजनांसाठी व महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खूले केले..त्यांनी हंटर आयोगासमोर ‘प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करा’ अशी मागणी केली..त्यांचे शिक्षणविषयक योगदान तसेच त्यांनी शेतकरी व बहूजन समाजाविषयी केलेले कार्य यामुळे इ.स.१८८८ मध्ये जनतेने त्यांना ‘ महात्मा ‘ ही पदवी दिली…त्यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली..ते इ.स.१८७६ ते इ.स.१८८२ या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते.
.पुण्यनगरीतील अनेक तत्कालीन सुधारणा व विकासकामे करण्यात महात्मा फुलेंचे योगदान होते…अखेर इ.स.१८९० साल उजाडले..२८ नोव्हेंबर या दिवशी ‘जगाचे कल्याण करणारा’ हा महान आत्मा ‘पुणे’ येथे अनंतात विलीन झाला..सर्वांना ज्ञानप्रकाश देणारा क्रांतीसूर्य अखेर मावळला..परंतू आजही देशात स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य सर्वांच्या स्मरणात आहे.
बहुजनांसाठी व स्त्री शिक्षणासाठी अखंडपणे झटणाऱ्या महात्माजींची आज पुण्यतिथी..त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन….
(शब्दांकन….उमेश जनार्दन माळी, शेलारवाडी,मावळ,पुणे )

error: Content is protected !!