लोणावळा:
मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख ,उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्यासमवेत लोणावळा व परिसरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.
पर्यटनस्थळांवरील पाहणी करताना स्थानिक समस्यांबरोबर येथील सोयीसुविधांचा देखील आढावा घेण्यात आला.राजमाची गार्डन, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट आदि ठिकाणांवर जाऊन जिल्हाधिकारी यांना सविस्तर माहिती दिली.
मावळ तालुक्याची ओळख पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून होऊ लागली आहे.तालुक्यातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे.यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी स्थानिकांना निर्माण होऊ लागल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा,मनोरंजन, विरंगुळा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पर्यटकांना विविध पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी झीप लाईन,व्हॅली क्रॉसिंग, रोप वे असे साहसी प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. राज्य सरकारने राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे.
या साहसी पर्यटन धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. वन विभागाच्या हद्दीतील काही ठिकाणी नियम,परवानग्या यांमुळे असे प्रकल्प राबविताना अडचणी येतात. त्यासाठी अधिकाऱ्यांनी या प्रक्रिया सुलभ करून सहकार्य करणे अपेक्षित आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.पर्यटन वाढीच्या दृष्टीने स्थानिक विकास होणे गरजेचे आहे.
पर्यटकांना रस्ते,पाणी,स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. ही पर्यटन स्थळे आता फक्त सेल्फी पॉइंटसाठी न राहता याठिकाणी वॉटर लाईट शो, लहान मुलांसाठी खेळणी, म्युझिकल रेन डान्स इ.प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. भविष्यातील पर्यटन विचारात घेता असे विविध प्रकल्प याठिकाणी राबवावे लागतील. पर्यटन वाढ झाल्यास त्याचा फायदा स्थानिक छोटे-मोठे व्यावसायिक, टपरीधारक, हॉटेल्स यांना नक्कीच होईल.या पर्यटनस्थळांवरील पाहणी करत असताना स्थानिक व्यवसायिकां सोबत देखील संवाद साधण्यात आला.
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थिती समजून घेतल्यानंतर यावर लवकरच योग्य मार्ग काढून विकासकामांची सुरुवात करण्यात येईल. पर्यटन वाढीच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नक्कीच सहकार्य केले जाईल,असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, सुशिल मंतावार, लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, अनिल मालपोटे, मयुर झोडगे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!