मावळमित्र न्यूज विशेष:
तो काळ पारतंत्र्याचा..१९०३ साली आंदर मावळातील ठोकळवाडी धरणाचे काम पूर्णत्वाकडे गेले होते.या मावळ भागातील गावेच्या गावे विस्थापित झाली..एका बाजूला सहयाद्रीचे उंच उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला टाटाचे विशाल धरण…अशा कात्रीत अनेक नागरिक सापडले …अशा परिस्थितीत अनेक गावांनी डोंगराच्या कुशीत विसाव्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.परंतू काही कुटुंबे ही विस्थापित होऊन जवळच्या नातेवाईकांकडे राहायला गेली…
त्या काळात धरणग्रस्त झालेल्या ‘डाहुली’ गावातील तनपुरे कुटुंब हे देखील त्यापैकीच एक. या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख होते श्री कोंडाजी तनपुरे. चार भावांचं सुखी -समाधानी कुटुंब…पांडुरंग,धोंडिबा व गणपत हे भाऊ देखील कुटुंब राबत होते…राबणा-या हाताला यश अन बरकता मिळत होती…
हे चारही भाव हातभार लावून प्रपंच नेटाने संभाळित होते.याच काळात टाटा धरणात जमीन गेल्यानंतर कोंडाजी यांच्यासमोर मोठा प्रश्न होता तो कुटुंबाच्या उपजीविकेचा.या संकटसमयी कोंडाजी यांच्या पत्नी सौ.रखमाबाई या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.एकुलता एक मुलगा बाबूराव व कन्येला घेऊन त्यांनी आपल्या माहेरी म्हणजे वहानगाव येथे जाण्याचा निर्णय घेतला.
वहाणगाव येथील गावातील प्रमुख असणारे कुटूंब येसू भाऊराव वाडेकर हे रखमाबाईचे वडील.त्यांच्या आधारावर कोंडाजी व रखमाबाई यांचा सुखी संसार सुरु होता. बाबूराव यांचे लग्न झाले होते.त्यांच्या धर्मपत्नी गहिनाबाई संसारात सुखी समाधानी होत्या.बाबूराव व गहिनाबाई यांच्या सुखी संसाराला कष्टाची जोड होती. तीन मुले व तीन मुली असा मोठा परिवार पाठीशी होता. घरात अध्यात्मिक संस्कार होते. कुटुंब सामाजिक कार्यात सहभाग असायचे.
नथुराम,सीताराम,रामचंद्र,सोनाबाई,पार्वतीबाई,ताराबाई ही भावंडे मोठी झाली होती.तनपुरे कुटुंब आता धार्मिक व सामाजिक कार्यात अधिकाधिक सहभागी होत होते.त्याकाळात वहाणगावात जिल्हा लोकल बोर्डाचे बोर्डिंग स्कूल होते.गावातील व परिसरातील मुले याच ठिकाणी शिक्षण घेत होती.त्याकाळी सातवीला बोर्डाची परीक्षा असायची.परंतू विद्यार्थीसंख्येअभावी सातवीचा वर्ग बंद होण्याची भीती शाळेसमोर होती.म्हणून त्यावर पर्याय म्हणून इयत्ता पाचवीला अत्यंत हुशार असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना थेट सातवी इयत्तेत बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यात एक होते जाखोबा भाऊराव वाडेकर अन दूसरे होते रामचंद्र बाबूराव तनपुरे.
रामचंद्र बाबुराव तनपुरे शालेय जीवनापासून अत्यंत हुशार असणाऱ्या ‘रामचंद्र’ यांना सामाजिक कार्याची अत्यंत आवड होती. त्याकाळात वहाणगावात भजनी भारुड होते. त्या भारुडामध्ये त्यांनी संत तुकारामांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली.ज्याची दखल अनेक लोकप्रतिनिधीनी घेतली.
अगोदरच धार्मिक कुटुंबात वाढलेले रामचंद्र यांनी संत तुकाराम यांच्या जीवनावर साकारलेल्या संत तुकाराम महाराज भूमिकेचा सखोल असा प्रभाव पडला.ते आता आळंदी-पंढरीचे निष्ठावंत वारकरी बनले.ज्ञानेश्वरी,गाथा व संत साहित्याचे वाचन इ.त्यांनी सुरु केले.त्यांचे अनेक अभंग तोंडपाठ होते.सुंदर आवाजाची देणगी तर त्यांना लाभलेलीच होती.याबरोबरच सामाजिक काम देखील सुरू होते.
या कामाची पावती म्हणून त्यांना १९८०-१९८५ या काळात ‘ग्रामपंचायत सदस्यपद’ भूषविण्याची संधी मिळाली.त्यांच्या कार्यकाळात ‘सामाजिक वनीकरण’ ही योजना त्यांनी गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविली.समाजकारण,राजकारण याबरोबरच सहकार क्षेत्रात ‘आंदर मावळ दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या संचालक व अध्यक्षपदावरून’ काम करताना दूध संस्था ही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा कणा आहे,हे मानून त्यांनी कायम दूध उत्पादकांचे हित जोपासले.
दुधसंस्थेवर एकाच वेळी ते स्वतः चेअरमन व त्यांचे जेष्ठ बंधू सिताराम तनपुरे हे सचिव म्हणून काम पाहत होते.हा तनपुरे कुटुंबीयांचा गावाने केलेला गौरवच होता.या संपूर्ण समाजकार्यात धर्मपत्नी सीताबाई यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली. प्रपंचातून परमार्थ हे तत्त्व त्यांनी सदैव अंगिकारले होते.आपल्या विनोदीशैलीने इतरांच्या जीवनात हास्याचे कारंजे फुलवणारे रामचंद्र तनपुरे आध्यात्मिक अभ्यासाच्या बळावर प्रवचन,किर्तन करू लागले.त्यांनी आपल्या कीर्तनातून नेहमीच सामाजिक संदेश दिला.
आजची पिढी व अध्यात्माची गरज या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.हे सर्व करत असताना कौटुंबिक जबाबदारी देखील नेटाने पेलली.त्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय व त्याला दुग्धव्यवसायाची जोड देऊन त्यांनी श्रमप्रतिष्ठा जोपासली. कृषीनिष्ठ शेतकरी,आदर्श दूध उत्पादक म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. कुटुंबातील सदस्य आवडीने त्यांना ‘ नाना’ म्हणायचे.कुटुंबातील लहान-मोठ्यांचे नाना हे अल्पावधीतच गावातील थोर-मोठ्यांच्या आवडीचे झाले.नानांनी काळूबाई पाणलोट क्षेत्राच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गावामध्ये विविध विकासकामे मार्गी लावून तरुणांपुढे आदर्श निर्माण केला.
नानांनी शाळा ही गावच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू आहे असे मानून तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिलीप टाटीया यांच्यासमवेत भैरवनाथ विद्यालय स्थापनेत सिंहाचा वाटा उचलला.जाणकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून २ वर्गखोल्या बांधल्या व सहकार तत्त्वावर आधारित किराणा दुकान सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. नानांनी गावातील आध्यात्मिक वातावरण वाढावे म्हणून विठ्ठल-रुख्मिणी मंदिर उभारण्यासाठी आग्रही भूमिका घेतली व तद्नंतर अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून आध्यात्मिक चैतन्य निर्माण केले. गावच्या अनेक बैठकीत त्यांनी सार्वजनिक हिताची भूमिका मांडली. गावातील शांतता, सलोखा नानांनी सदैव टिकवला.
त्यांनी लहानग्यांशी लहान होऊन व मोठ्यांशी प्रेमाने-आपुलकीने वागून कधी विनोद बुद्धीने तर कधी शब्दांचे मार्मिक टोले लगावताना इतरांनी अनुभवले आहे.नंतरच्या काळात नानांना मावळ तालुका दिंडी समाजाने सोपविलेली ‘विणेकरी’ पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.आंदर मावळ आध्यात्मिक विकास केंद्राची स्थापना करून अनेकानेक तरुणांना नानांनी अध्यात्माकडे वळविले.आळंदी-पंढरीचे निष्ठावान वारकरी,संप्रदाय,सहकार, शिक्षण, राजकारण इ.गोष्टींना परिसस्पर्श करून गेलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘नाना’ …गतवर्षी एका अल्पशः आजाराने अचानकपणे आपल्यातून निघून गेले.”गेले दिगंबर ईश्वर विभूती,राहिल्या त्या कीर्ती जगामाजी”आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण.. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन..
(शब्दांकन- राजू वाडेकर,सर)

error: Content is protected !!