सोमाटणे:
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन राजकीय द्वेषापोटी होत असलेल्या कारवाई विरोधात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग उर्से टोलनाक्यावर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको करून कारवाईचा निषेध करण्यात आला.
तीन दिवसांपासून केंद्रीय आयकर विभागाच्या वतीने पवार यांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक यांच्या घरावर छापे टाकून कारवाई करीत असल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादीने महामार्ग रोखून धरला.राष्ट्रवादीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ संपुर्ण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरुन पाठिंबा दर्शवत आहे. आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला आदर्श राजकारणाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. परंतु केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर राजकीय सुडबुद्धीतुन करण्याचा नवा अध्याय महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील काही नेते करीत आहेत ,असा घणाघात करीत या षड्यंत्राच्या पडद्यामागे असणारे सूत्रधार यांनी त्याआधी महाराष्ट्रातील जनतेचे अजितदादांवरील प्रेम बघावे असा सल्ला राष्ट्रवादीने दिला.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” सकाळी सहा वाजल्यापासून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दादा कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील जनता तुमच्या अशा षडयंत्राना बळी पडणार नाही. दादांवर सुडबुद्धीतुन केलेल्या या कारवाईचा महाराष्ट्राची जनता निश्चितच विचार करेल.
केंद्र सरकारच्या सुढबुध्दीच्या राजकारणाचा जाहीर निषेध करण्यात आला. अजितदादा पवार यांच्यावर झालेल्या राजकीय कारवाईचा निषेधार्थ आज उर्से टोलनाका येथे मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, अशोकराव घारे , युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे ,सुनिल भोंगाडे, कैलास गायकवाड , काळुराम मालपोटे, सनी पाळेकर, आशिष बसंल, सुवर्ण राऊत, वैशाली दाभाडे, नितीन मुऱ्हे, सचिन मुऱ्हे, आशिष खांडगे,निलेश राक्षे तुषार काळोखे, लहू सावळे ,संदिप साठे ,संजय मोहोळ, अजित चौधरी, रोहीदास घारे ,नंदू धनवे, लाला गोणते, संदिप मुऱ्हे, भरत भोते ,मारुती ओझरकर व महिला पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!