मुंबई:
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पासून सुरू होणा-या मिशन कवच कुंडलची घोषणा केली. या घोषणेत दर दिवशी सुमारे पंधरा लाख नागरिकांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणार आहे.नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यात एकीकडे टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील हळूहळू वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या रुग्णवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आलेलं आहे.
मात्र, अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून त्यासाठी वेगाने पूर्ण जनतेचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात दसऱ्यापर्यंत १०० कोटी लसीचे डोस देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेलं असताना राज्य सरकारने त्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ योजनेची घोषणा केली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यासंदर्भात घोषणा केली.
●८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरचं लक्ष्य
“१५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत देशात १०० कोटी लसीकरण व्हावं असं केंद्रानं ठरवलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र देशातल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी नाही. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील माझ्याशी फोनवर चर्चा करून राज्याचा या १०० कोटींच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्यासाठी आपण मिशन कवच कुंडल योजना ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत राबवणार आहोत. रोज किमान १५ लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य आपण ठेवलं आहे. पूर्वी लस उपलब्ध नसायची तशी परिस्थिती आता नाही. या क्षणाला ७५ लाख लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत. २५ लाख आज उपलब्ध होतील. त्यामुळे १५ लाख लसीकरण रोज केलं तर ६ दिवसांत हा स्टॉक पूर्णपणे संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिलं आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.
आजपर्यंतच्या लसीकरणाची एकूण टक्केवारी पाहाता राज्याला एकूण ९ कोटी १५ लाख एवढ्या नागरिकांचे दोन्ही डोस करायचे आहेत. यातल्या ६ कोटी नागरिकांना पहिला डोस पूर्ण झालेला आहे. उर्वरीत ३ कोटी २० लाख नागरिकांना पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट आहे. ते झालं तर राज्यातल्या १८ वर्षांवरील जवळपास सर्व नागरिकांना पहिला डोस पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, अडीच कोटी नागरिकांना दुसरा डोस देऊन झाला आहे. ६५ टक्के नागरिकांना पहिला डोस आणि ३० टक्के नागरिकांना दुसरा डोस आपण पूर्ण केला आहे. आता पहिल्या डोसला प्राधान्य द्यायचं आहे. त्यानुसार तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कमी होण्यास मदत होईल, असं देखील राजेश टोपे यांनी नमूद केलं.

error: Content is protected !!