मावळमित्र न्यूज विशेष:
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा निसर्गसंपन्नच.उंच उंच डोंगर,पांढरेशुभ्र धबधबे,विस्तीर्ण जलाशय,दाट झाडी, हिरवीगार वनराई मावळच्या सौंदर्यात अधिकाधिक भर टाकत आहे. याच मावळ तालुक्याच्या पूर्व सीमेवरील ‘शेलारवाडी’ हे एक पुढारलेले गांव..या गावाच्या एका बाजूला पवित्र इंद्रायणी नदी व दुसऱ्या बाजूला जुना पुणे-मुंबई महामार्ग आहे.
मध्य रेल्वेच्या ‘बेगडेवाडी’ या स्टेशनच्या नजीक असल्याने रेल्वेच्या धडधडीने पहाटे लवकरच जागे होणारे हे गांव एके काळी ‘नाट्यमंडळ व ढोल-लेझीमच्या’ माध्यमातून महाराष्ट्रभर गाजले होते.अशा या गावातील अनेक नागरिक घोरावडेश्वर डोंगरावरील ‘महादेवाचे’ परमभक्त आहेत.येथील युवकवर्ग सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे.येथे विविध धार्मिक उत्सव पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे व आनंदात साजरे केले जातात.
मावळ तालुक्यात प्रसिद्ध असणारी ‘अमरदेवी माता’ ही या गावचे ग्रामदैवत…या देवीबाबतची आख्यायिका सर्वत्र प्रसिद्ध आहे…”जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अमरदेवी मातेचे जागृत देवस्थान असून देवी ही स्वयंभू आहे..येथे त्रिगुणात्मक महाकाली,महालक्ष्मी व महासरस्वती प्रत्यक्ष ब्रम्हरुपिणी ओंकारस्वरुपात अधिष्ठित आहे.अमरदेवीला ‘अमरजाई’ या नावानेही संबोधले जाते.
कौरव-पांडवांच्या काळात पांडवांना जेव्हा १४ वर्षे वनवास भोगावा लागला होता तेव्हा पांडव अज्ञातवासात असताना काही काळ शेलारवाडी गावच्या जवळील ‘घोरावडेश्वर’ डोंगरावर त्यांचे अस्तित्व होते.त्या काळात पांडव एका ठिकाणी बसून आपल्या जगदंबेचे स्मरण करत असताना ते ज्या जागी बसले होते तेथे एक दगडाची भव्य शिळा होती.
त्याचवेळी एक चमत्कार झाला व ती शिळा दुभंगून तेथे एक अष्टभूजा देवीची मुर्ती प्रकट झाली.देवीचे त्रिगुणात्मक स्वरुप पाहून पांडव अत्यानंदीत झाले.देवीने प्रत्यक्ष साक्षात्कार दिल्याने त्यांना पुढील काळ हा शुभ वाटला.त्यांनी देवीची मनोभावे पूजा करुन देवीला नमस्कार केला.त्याच वेळी देवीने आशिर्वाद दिला की तुम्ही अमर होऊन तुमचा पुढील काळ हा सुख-समृद्धीचा जाईल व नंतर देवी अंतर्धान पावली..तद्नंतर त्या देवीला सर्वत्र ‘अमरजाई’ अथवा ‘अमरदेवी’ या नावाने ओळखले जावू लागले.
‘चैत्र शु.सप्तमी’ या दिवशी श्री.अमरदेवी मातेचा वार्षिक उत्सव असतो..घटस्थापनेपासून तर विजयादशमीपर्यंत नवरात्रोत्सवाच्या काळात येथे प्रचंड गर्दी असते..नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने दूरवरुन भाविक देवीच्या दर्शनाला येतात…नवरात्रोत्सवाच्या काळात येथील मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते.अमरदेवी मातेच्या मुख्य मंदिरासोबतच येथे श्री.गणेश व श्री.राधाकृष्ण यांचीही मंदिरे आहेत.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीचे मंदिर भक्तांसाठी खुले झाले आहे…देवीचे दर्शन घेतल्याने मनाला प्रसन्नता लाभत असल्याने सर्व शासकीय नियमांचे पालन करुन देवीचे दर्शन घेता येणार आहे.
(शब्दांकन- उमेश जनार्दन माळी ,शेलारवाडी)

error: Content is protected !!