मावळमित्र न्यूज विशेष
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचं नाव अग्रभागी आहे, असे मोहनदास करमचंद गांधी.आज त्यांची जयंती.ते आपले राष्ट्रपिता. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमध्ये पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधीजी यांचा जन्म झाला. रवींद्रनाथ टागोर यांनी महात्माजींना महात्मा पदवी दिली.
लोक प्रेमाने त्यांना बापू असेही संबोधत असत.
सन १८८८ साली इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्याय शास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. इ. स. १८९३ ला एका कंपनीचे वकील म्हणून त्यांनी दक्षिण आफ्रिकेला जाऊन काम पाहिले. तेथील २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी वर्णभेदावर अहिंसक पद्धतीने अनेक प्रकारची आंदोलनं छेडली.
त्यात ते यशस्वी झाले आणि त्यातूनच ते भारतीयांचे हिरो ठरले. १९१७ साली गांधीजी भारतात परतले. पारतंत्र्यात असलेला आपला देश त्यांना प्रचंड वेदना देऊन गेला. संपूर्ण भारतभ्रमण करत असताना दिन दुबळ्यांचे दुःख त्यांचे हृदय हेलावून टाकत होते. हे भ्रमण करताना घेतलेल्या अनेक अनुभवातून त्यांनी अगदी सामान्यातलं सामान्य जीवन जगण्याचं ठरवलं.
साधी राहणी त्यांनी पत्करून गोर गरिबांचे कैवारी बनण्याचे ठरवले. असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, चलेजाव चळवळ, या चळवळींनी गांधीजींनी इंग्रजांना अगदी सळो कि पळो करून सोडलं. भारताला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी या चळवळींचा प्रचंड फायदा झाला.
सत्य व अहिंसा हा गांधीजींनी संपूर्ण जगाला दिलेला एक तारक मंत्र आहे. सत्य आणि अहिंसेच्या वाटेने देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना गांधीजीनी एक कायमचा आदर्श निर्माण करून ठेवला. आजही ब्रिटिश संसदेच्या बाहेर महात्मा गांधीजींचा पुतळा पाहायला मिळतो. गांधीजी नेहमी म्हणत असत, विरोधकांच्या बद्दल माझ्या मनामध्ये कधीही द्वेष भावना निर्माण उत्पन्न होऊ नये, हीच माझी प्रार्थना आहे.
मृत्यूला सामोरे जाताना सुद्धा त्यांनी ईश्वरचिंतन सोडले नाही. विश्वशांतीचा इतका व्यापक विचार दुसरा कोणी केला नसेल. गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेले अनेक जण आपल्याला देशभरात पाहायला मिळतील. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, स्टीव्ह बिको, अल्बर्ट आईन्स्टाईन यांसारख्या थोर विचारवंतांवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव प्रभावितपणे जाणवतो.
माझ्या स्वप्नांचा भारत, राजकारण, सत्याग्रह, हरिजन, अहिंसा विचार, नैतिक धर्म या आणि अशा अनेक ग्रंथांची निर्मिती गांधीजींनी केली. आजच्या गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी दिलेली शिकवण आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, हीच बापूंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..
( शब्दांकन – तुळशीराम जाधव,कशाळ)

error: Content is protected !!