वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी “महाराजस्व” अभियानांर्तगत “शासन आपल्या दारी” हा उपक्रम गावोगावी राबवला जात आहे. तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन केले जाते आहे. या उपक्रमास नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
आमदार शेळके यांनी तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींच्या घेतलेल्या दुसऱ्या आढावा बैठकीत सर्व अधिकारी वर्ग, ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्या समोर ही अभिनव संकल्पना मांडली होती.आणि सर्वांकडूनच या संकल्पनेला जोरदार प्रतिसाद मिळाला.
सुयोग्य नियोजनासह विविध योजनांचा आपल्या गावातच लाभ घेता आला. २९ सप्टेंबरला कशाळ गावात “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात झालेल्या उपक्रमात जवळपास १०८८ लाभार्थ्यांना विविध योजनांमध्ये लाभ मिळवून देण्यात आला. ग्रामपंचायतीतर्फे विवाह नोंदणी दाखले, घराचे ८ अ चे उतारे, मृत्यू प्रमाणपत्र, जन्म दाखले, तसेच मनरेगा साठीचे प्रस्ताव देण्यात आले. साधारण ७० जणांना आधार कार्ड सेवेचा लाभ घेता आला.
आरोग्य विभागातर्फे २३० जणांना कोविशील्डचे लसीकरण करण्यात आले. रेशन कार्डसाठी ८५ कुटुंबांचे अर्ज स्वीकारण्यात आले. ५९ कुटुंबांना दुबार रेशन कार्डची व्यवस्था करण्यात आली. रेशन कार्डवर ३२ जणांची नावे नोंदवली गेली. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींची आणि विवाह होऊन सासरी गेलेल्या मुलींची एकूण २४ नावे कमी करण्यात आली. अन्न सुरक्षेसाठी १५ अर्ज स्वीकारण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच तुळशीराम जाधव यांनी दिली.
महावितरणच्या नवीन कनेक्शन साठी १७ अर्ज आले तर ४ वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. कृषी विभागामार्फत विविध योजनांचा लाभ देण्यात आला. फळबाग लागवड योजना, गांडूळ खत प्रकल्प, नाडेप कंपोस्ट प्रकल्प, योजनांची माहिती, अशा १८ जणांनी कृषी खात्यातील योजनांचा लाभ घेण्यसाठी अर्ज दाखल केले.
महिला बाल कल्याण विभागातर्फे ८ मुलांना आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र पुरवून, महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांबद्दल जनजागृती करण्यात आली. पशुवैद्यकीय विभागाने ४१ लाभार्थ्यांना लाभ मिळवून देताना येणाऱ्या साथीच्या आजारांबाबत जनजागृती करत एकूण १७१ जनावरांसाठी औषधे वाटप करण्यात आली. खनिज मिश्रण वीट, झिंक ऑक्साईड, बायोवेट टॉनिक इत्यादी औषधांचे वाटप करण्यात आले.
जनावरांच्या विम्यासंदर्भात जनजागृती करत दुग्ध व्यवसाय शास्त्रशुद्ध पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोठा मालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण विभागातर्फे १७ जणांना बोनाफाईड सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. तसेच “बेटी बचाओ, बेटी पढाओ” विषयी गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
या अभियानास आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके, नगरसेवक संदीप शेळके यांनी भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली.
सर्व मान्यवरांचा, अधीकारी वर्गाचा कशाळ ग्रामस्थ, ग्रुप ग्रामपंचायत कशाळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.
आमदार शेळके, यांच्या संकल्पनेमुळे आज मावळ वासियांना आपल्या गावातच विविध योजनांचा लाभ घेता येतो, अनेकांचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. त्याबद्दल ग्रामपंचायती तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायती तर्फे सांगण्यात आले.

error: Content is protected !!