तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्यासाठी कोविशिल्ड लसीचे आणखी १० हजार डोस उपलब्ध झाले असून, चौथ्या टप्प्यात येत्या शुक्रवारी (२४ सप्टेंबर)ला संपूर्ण तळेगाव दाभाडे शहरात महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी शहरात १९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून तळेगावातील नागरिकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.
लसीकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी स्पर्धा करताना लसीकरण केंद्रांवर होणारे अनावश्यक वादविवादाचे प्रसंग टाळून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. लस उपलब्ध असेपर्यंत लसीकरण सुरूच राहणार आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी व कोविडचे नियम पाळून कोविड मुक्त मावळसाठी प्रयत्नांना साथ द्यावी, अशी विनंती आमदार शेळके यांनी तळेगावातील जनतेला केली आहे.
यापूर्वी तालुक्यात ३१ ऑगस्टला १५ हजार तर १३ सप्टेंबरला १८ हजार, १७ व १८ सप्टेंबरला १० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आमदार शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मंगळवारी आढावा बैठक घेतली होती.या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे शहरातील लसीकरणाची गती कायम ठेवण्यासाठी आमदार शेळके यांनी विशेष पाठपुरावा करून आणखी १० हजार डोस उपलब्ध करून दिले आहेत.
या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे, रिक्रिएशन हॉल तळेगाव जनरल हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल, मायमर हॉस्पिटल, लोकमान्य टिळक शाळा क्रमांक तीन, नांगरे हॉस्पिटल, सेवाधाम हॉस्पिटल, हरणेश्वर हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, आरोग्यम मल्टीस्पेशलिस्ट क्लिनिक, थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे शाळा क्रमांक एक, नगरपरिषद कन्या शाळा क्रमांक, लायन्स क्लब कडोलकर कॉलनी, ढाकणे हॉस्पिटल, यशोधाम हॉल तपोधाम कॉलनी, गजानन महाराज मंदिर, कैकाडी समाज मंदिर, वैशाली मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर शाळा क्रमांक सहा अशा एकूण १९ केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे. 
शहरातील १८ वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी कोविशिल्डच्या पहिल्या व पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी लसीकरण होणार आहे. तरी कोविडचे सर्व नियम पाळून गर्दी न करता सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त केंद्रांवर लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे.सर्व केंद्रांवर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहील. लसीकरणासाठी एकदम गर्दी करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, प्रशासकीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे व नागरिकांच्या सहकार्यामुळे गेले दीड वर्षापासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोविड रुग्णांच्या उपचारात सहभागी आहे. तसेच गेल्या सात महिन्यांपासून लसीकरणाच्या कामकाजामध्ये संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामकाज पाहत आहे. आतापर्यंत मावळ तालुक्यात तीन लाखांहून अधिक लाभार्थींचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे आमदार सुनिल शेळके म्हणाले.

error: Content is protected !!