तळेगाव दाभाडे :
आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली.सत्ताधारी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवक या बैठकीला अनुपस्थित असल्याने आमदार शेळके यांनी सत्ताधारी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. याच बैठकीत तळेगाव दाभाडे शहरात होणा-या महालसीकरण अभियानाचे नियोजन करण्यात आले.
लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद आहे.जास्तीत जास्त केंद्रे निश्चित करून शुक्रवार दि. २४ रोजी १० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून याच अनुषंगाने महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.
या बैठकीसाठी सत्ताधारी भाजपच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,गटनेते,नगरसेवक अनुपस्थित राहिले. शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करूनही गैरहजर राहणे हे शहराच्या हिताचे नाही.जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून तरी कामे करा असा सल्ला आमदार शेळके यांनी दिला.
आमदार शेळके म्हणाले,” ३५ कोटी ८८ लाख रुपये मंजूर केलेल्या निधी पैकी एकही काम सुरू केलेले नाही.शहराच्या विकासाचे सत्ताधारी भाजपला काही देणे घेणे नाही.राजकारण बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे नगराध्यक्ष,नगरसेवक एकत्र येत नाहीत.त्यामुळे विकासकामांना गती मिळत नाही.नगरपरिषदेची परिस्थिती सध्या बिकट आहे.पुढील आठ दिवसात विकासकामांचे ठराव दिले तर आणखी पंधरा कोटी रु. निधी उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न आहे.
भुयारी गटार योजनेच्या कामांचा आढावा घेतला. मागील अनेक दिवसांपासून या कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. पाण्याची पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई आणि पुन्हा ड्रेनेजसाठी रस्ते खोदाई होत आहे. यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी समन्वय ठेवून ही कामे पूर्ण केली पाहिजेत. या कामांच्या नियोजनाअभावी शहराला बकाल स्वरूप आले आहे.
दोन्ही योजना झाल्यानंतर रस्त्याचे काम करता येईल. संपूर्ण शहरात मोठे मोठे खड्डे रस्त्यावर दिसत आहेत.
फळेभाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही गाव ते स्टेशन रस्ता (नगरपरिषद समोरील रस्त्यावर)अनेक विक्रेते बसलेले दिसतात.त्यामुळे रस्त्यावर गर्दी होते व याठिकाणी अपघाताचा धोका संभवतो. वर्दळीच्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने रस्त्याकडेला फेरीवाल्यांना बसण्यास नगरपरिषदेने मनाई करावी.त्यामुळे अपघातांना आळा बसेल.
नवीन गॅस शवदाहिनीसाठी ६०लाख रु.निधी उपलब्ध केला आहे. स्टेशन परिसरात ही शवदाहिनी उभारण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तळेगाव-चाकण रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सा.बां.विभाग,नगरपरिषद यांनी समन्वय ठेवून विद्युत खांब काढण्यासाठी वारंवार सूचना दिल्या आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा अपघात वाढले आहेत.यावर योग्य मार्ग काढण्यासाठी बैठकीत चर्चा झाली.
ग्रामदैवत डोळसनाथ मंदिराच्या सभामंडपाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.ते पूर्ण करण्यासाठी निधी कसा उपलब्ध करण्यात येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी नगरपरिषदेने योग्य ठराव दिला तर तशा निधीसाठी मागणी करता येईल.
•तळेगाव दाभाडे ऐतिहासिक शहराला साजेशी नगरपरिषदेची नवीन इमारतीसाठी सुमारे १४ कोटी ८० लाख रु.निधी उपलब्ध झाला आहे. इमारतीचे काम सुरू करण्यासाठी जुन्या इमारतीचे स्थलांतर करावे. अशा सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुख्याधिकारी सतीश दिघे,विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे,अरुण माने, नगरसेविका वैशालीताई दाभाडे,मंगलताई भेगडे, संगीताकाकी शेळके, हेमलताताई खळदे, तालुका समन्वयक गुणेश बागडे, सा.बां.उपअभियंता वैशाली भुजबळ, पोलीस निरीक्षक शहाजी पवार व इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!