पुणे:
कोरोना बाधितांची रुग्ण संख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी, गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढवण्यात येत असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं. कोरोना बाधितांची रुग्ण संख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी, गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गणेशोत्सव साधेपणानं साजरा करणार असल्यानं नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीत. मात्र नागरिकांनी गर्दी केली, तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईल, असं बैठकीत दादांनी स्पष्ट केलं. कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीनं करण्यावर शासनाचा भर आहे. सामाजिक दायित्वातून क्रांतीदेवी बजाज ट्रस्टनं दिड लाख लस दिली, हे कौतुकास्पद आहे.
स्वयंसेवी संस्थांचं अशा कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्याचं नियोजन आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात मोठं यश आलं आहे. खाजगी संस्थांमध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढवा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी आपण सर्वजण गत दीड वर्षांपासून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. महानगरासह ग्रामीण भागात काळजी घेतली नाही, तर तिसरी लाट येऊ शकते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये यासाठी नियमांचं पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर यांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

error: Content is protected !!