वडगाव मावळ: रेल्वे विभागामार्फत मावळ लोकसभा मतदारसंघात नागरिकांच्या सोईसाठी सुरु असलेल्या ओव्हर ब्रीज, अंडरपासच्या कामाला गती द्यावी. कान्हे फाटा येथील ओव्हर ब्रीजचे काम सुरु करण्यासाठी राज्य सरकारची आवश्यक असलेली ‘एनओसी’ लवकरच मिळवली जाईल. त्यानंतर त्याही कामाला सुरुवात होईल. देहूरोड येथील अप्रोच रोडच्या कामाची गती वाढवावी. अडीच ते तीन महिन्याच्या आतमध्ये त्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे अधिका-यांना दिल्या. तसेच कामशेत येथील रेल्वे गेट बंद केले जाणार नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी निश्चिंत रहावे, असेही बारणे म्हणाले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड, वडगाव, शेलारवाडी, कान्हे फाटा, कामशेत येथे रेल्वेविभागामार्फत सुरु असलेल्या आणि विविध कारणांमुळे रखडलेल्या विकास कामांची खासदार बारणे यांनी गुरुवारी (दि.26) रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, शेतकरी, नागरिक यांच्यासोबत पाहणी केली. अंडरपास, ओव्हर ब्रीजची कामे येत्या काही दिवसांत मार्गी लागतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी पाहणी दौ-यात व्यक्त केला.
खासदार बारणे यांच्यासोबत रेल्वे विभाग पुणे परिमंडलाच्या मुख्य प्रबंधक (डीआरएम) रेणू शर्मा, विभागीय व्यवस्थापक सुनील मिश्रा, गौतम मुसळे, जे.पी.मिश्रा, रेल्वे कमिटीचे सदस्य बशीर सुतार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, सुनील हगवणे, रघुवीर शेलार, जिल्हा महिला संघटिका शैला खंडागळे, सुनंदा आवळे, रमेश जाधव, रामभाऊ सांवत, अंकुश देशमुख, गणेश भोकरे तालुक्यातील इतर पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडगाव येथील पाहणी दरम्यान नगराध्यक्ष मयूर ढोरे, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, ”देहूरोड राष्ट्रीय महामार्ग एनएच 4 येथे चालू असलेल्या रेल्वे मार्गावरचा ओव्हर ब्रीज पूर्ण झाला. ‘अप्रोच’ रोडचे काम तत्काळ पूर्ण करावे. कामाची गती वाढवावी. अडीच ते तीन महिन्यात पुल वाहतुकीसाठी खुला करावा. कान्हे फाटा येथे ओव्हर ब्रीज होत आहे. माझ्या पाठपुराव्यानुसार रेल्वे विभाग आणि केंद्र सरकारच्या वतीने या कामासाठी निधी ठेवला. त्याचा पूर्ण आराखडाही तयार आहे. निविदा प्रक्रियेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काम सुरु करण्यासाठी राज्य सरकारचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाली नाही. त्यामुळे काम थांबले असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले. याबाबत राज्य सरकारकडे तत्काळ पाठपुरावा करुन लवकरच ‘एनओसी’ मिळविली जाईल. त्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेल्या कान्हे फाटा ओव्हर ब्रीजचे काम मार्गी लागेल. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे”.
”शेलारवाडी येथील अंडरपासचे काम चालू आहे. काही कारणांमुळे संरक्षण विभागाने ते काम अडविले आहे. तिथे पाणी देखील साचत आहे. त्या कामाचीही खासदार बारणे यांनी पाहणी केली. वडगावमधील केशवनगर येथे सुरु असलेल्या अंडरपासच्या कामाची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. समस्या तत्काळ निकाली काढाव्यात. येत्या तीन ते चार महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना खासदारांनी रेल्वे अधिका-यांना दिल्या.
‘कामशेत येथील अंडरपास आणि नदीपात्राची लेव्हल समान आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले जात आहे. या समस्येतून कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी तिथे ओव्हर ब्रीज करणे गरजेचे आहे. परंतु, ओव्हर ब्रीज राज्य सरकारच्या माध्यमातूनच करावा लागेल. कारण, रेल्वे विभाग त्याकामासाठी खर्च करु शकत नाही. राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिला. तर, ओव्हर ब्रीजचे काम होईल. तोपर्यंत कोणत्याही प्रकारे रेल्वे गेट बंद केले जाणार नाही. याबाबत जिल्हाधिका-यांसोबत बैठक घेतली जाईल. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी निश्चिंत रहावे”, असे आश्वासन खासदार बारणे यांनी नागरिकांना दिले.
पुणे परिमंडलाच्या मुख्य प्रबंधक (डीआरएम) रेणू शर्मा म्हणाल्या, ”या पाहणी दौ-यात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्या तत्काळ निकाली काढल्या जातील. रखडलेल्या कामांबात रेल्वे विभागाकडून तोडगा काढला जाईल. कामांची गती वाढविण्यात येईल. कामे लवकरात-लवकर मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे”

error: Content is protected !!