बुलढाणा:
  श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाले. मागील तीन-चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती.दवाखान्यात दाखल होण्यास भाऊंनी नकार दिल्याने त्यांच्यावर घरीचउपचार सुरू होते. बुधवार दि.४ ऑगस्ट ला सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी भाऊंनी अखेरचा श्वास घेतला.
‘सेवा परमो धर्म’या तत्त्वानुसार निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ म्हणजे देवमाणूस अशीच त्यांची ओळख होती.
वयाच्या अठराव्या वर्षी श्री आज्ञेने शिवशंकरभाऊ मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यात सामील झाले. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्रीनुसार काम करीत शिवशंकरभाऊंनी मंदिर व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
निष्ठेने आणि श्रध्देने काम करणारे मंदिरातील हजारो सेवाधारी, डोनेशनसारख्या आर्थिक लाभला डावलून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थानच्या शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, भक्तनिवास, जागतिक किर्तीचा आनंदसागर प्रकल्प आणि अशा अनेक सेवाकार्याची उभारणी शिवशंकरभाऊंनी केली.
श्री गजानन महाराज संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकरभाऊंची निस्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ज्ञ, नियोजन तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली. असा हा कर्मयोगाचा दीपस्तंभ आज अकाली विझला आहे. शिवशंकरभाऊंच्या आकस्मात निधनाने विदर्भाची पंढरी पोरकी झाली आहे. संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!