डेंग्यू, मलेरियाला घाबरू नका:डाॅ. विकेश मुथा
कामशेत:
डेंग्यू, हिवताप(मलेरिया), लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांमुळे माणसे दगावल्याचे कानावर येत राहते आणि त्याचबरोबरीने या आजारांची भीतीही वाढू लागते. या तिन्ही आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते.
त्यामुळे रक्तस्राव होणे, थुंकीतून रक्त पडणे, लघवी किंवा विष्ठेमधून रक्त पडणे, अंगावर लाल चट्टे येणे ही लक्षणे दिसून येतात.शरीरामध्ये अडीच ते साडेतीन लाख प्लेटलेट्स असतात. या पेशी एक लाखांपेक्षा कमी झाल्या असतील, तर काळजी घेणे आवश्यक.मात्र धोकादायक नसते. प्लेटलेट्सची संख्या २० हजारांहून कमी झाल्यास मात्र धोक्याचे लक्षण आहे.
विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि मलेरियाचा ताप
या सर्व आजारांची लक्षणे साधारण एकसमान असून सुरुवातीला ताप येतो. त्यामुळे विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू, मलेरियाचा ताप कसा ओळखावा, असा प्रश्न पडतो. विषाणूंमुळे येणारा ताप साधारणपणे दोन ते चार दिवस असतो. या तापामध्ये अंगदुखी, उत्साह कमी होणे, थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.
•डेंग्यू किंवा मलेरियामध्ये घ्यावयाची काळजी
तापाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करावेत. शारीरिक अवस्थेनुसार आवश्यकता भासल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. औषधोपचार सुरू असतानाच रुग्णाचे जेवण आणि पाण्याच्या सेवनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मलेरियामध्ये रक्तातील साखर कमी होते. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांच्याबाबत ही काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करणे.
•तापाचे निदान आवश्यक
विविध जिवाणूंच्या संसर्गाप्रमाणे तापामध्ये विविधता असते. त्यामुळे विषाणूजन्य तापाव्यतिरिक्त लक्षणे आढळल्यास किंवा दोन दिवसांनीही ताप कमी होत नसल्यास डॉक्टरांकडे जाऊन तापाचे निदान करणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!