राष्ट्रीय शिक्षणाचे प्रवर्तक
गुरुवर्य अण्णासाहेब तथा विष्णु गोविंद विजापूरकर हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस. त्यांनी ब्रिटिश कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेची निर्मिती केली. तरुणाईच्या मनामनात व रक्ताच्या प्रत्येक थेंबात स्वातंत्र्य, देशप्रेम आणि एकात्मता रुजविली.
गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आम्ही आपसूकच नतमस्तक होतो. त्याच क्षणी आमचे मन आपण या संस्थेचा एक घटक आहोत. या भावनेने अभिमानाने भरून येते.
स्वधर्म ,स्वदेश, स्वभाषाभिमान यांच्या बळावर लोकमान्य टिळक यांनी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल राष्ट्रीय शिक्षणाच्या रूपाने विष्णु गोविंद विजापूरकर यांनी हाती घेतली. फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर दौरे करून तरुणाईला राष्ट्रीय शिक्षणाकडे वळविले .त्यांच्या या दिव्यत्वाचा जीवन पट निश्चितच प्रेरणा देणारा आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात जे अनेक कर्तृत्ववान आणि कर्तव्यदक्ष पुरुष होऊन गेले. त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षणाचे आद्य प्रवर्तक या नात्याने प्रोफेसर विष्णु गोविंद विजापूरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. यात तिळमात्र शंका नाही .सर्वांना आदर्शभूत अण्णासाहेब. साधी राहणी, निष्ठावंत मूर्ती ,एखाद्या निष्काम कर्मयोग याला शोभेल असा अविश्रांत उत्साह आणि दीर्घ विद्याव्यासंग ही सर्व गुरुवर्य अण्णासाहेब यांच्या व्यक्तिमत्त्वाची आभूषणे.
राष्ट्रीय शिक्षण हे विजापूरकरांच्या जीवनाचे ध्येय होते.
विजापूरकरांची मूळ घराणे देशपांडे या नावाने प्रसिद्ध होते .आदिलशाहीच्या काळात विजापूरला त्यांचे वास्तव्य होते .कथा कीर्तनातून लोकशिक्षणाचे कार्य करणे हा त्यांच्या घराण्याचा व्यवसाय होता. काही कारणास्तव देशपांडे घराणे कोल्हापुरास स्थायिक झाले. त्यानंतर विजापूरकर या नावाने लोक त्यांना संबोधू लागले . पुढे हेच आडनाव रूढ झाले.
विजापूरकर घराण्यात २६ ऑगस्ट १८६३ श्रावण शुद्ध १२ शके १७८५ या दिवशी अण्णासाहेब विजापूरकरांचा कोल्हापूर येथे जन्म झाला.अण्णा साहेबांचे पूर्ण नाव विष्णू गोविंद देशपांडे उर्फ विजापूरकर. ते बालपणापासूनच बाणेदार व निर्भीड वृत्तीचे. वडील कोल्हापूरच्या शिक्षण खात्यामध्ये नोकरीस.आई रुक्मिणी यांनी आपल्या दोन्ही पुत्र विष्णू आणि वासू वर उत्तम संस्कार केले. अण्णासाहेब एम. एस झाले. त्यांचे धाकटे बंधू वासू अण्णा एम. ए .एल .एल. बी झाले. विजापूरकर यांना लहान पणापासूनच वाचनाची प्रचंड आवड . भारतीय प्राचीन वाड्.मय याचे सखोल वाचन. प्राचीन वैदिक विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.
संस्कृत हा विजापूरकरांचा अतिशय आवडीचा विषय. संस्कृत, संस्कृत अध्ययन अतिशय सोपे व्हावे. यासाठी पुढे त्यांनी स्वतंत्र संस्कृत रचना करून अहोरात्र प्रयत्न केले .भाषा शिकवायची म्हणजे स्वाभाविक रीतीने संभाषणाने, श्रवणाने व अवलोकनाने शिकली म्हणजे सुलभपणे भाषा शिकता येते, असे ते म्हणत
विजापूरकरांचे गुरु डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या बद्दल एक अपूर्व श्रद्धा विजापूरकरांच्या मनात होती .
अण्णासाहेब कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात लेक्चरर म्हणून नोकरीस लागले.त्यांनी शाळेत शिक्षक म्हणूनही काम केले. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या उनाड मुलांसाठी शिक्षणाची विशेष गरज ओळखून त्यांनी उनाड मुलांचा वर्ग सुरू केला .अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकले. सर्वोदय व विद्यार्थ्यांच्या भावनांशी समरस होणारे शिक्षक म्हणून विजापूरकर कोल्हापुरात प्रसिद्ध होते .
अण्णा साहेबांनी आपले लक्ष मराठी वाडमयाच्या अध्ययनाकडे वळविले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास अशा सर्व संतांच्या साहित्याचा सखोल अभ्यास त्यांनी केला. श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांनी विजापूरकरांना नवा विचार दिला. अण्णासाहेबांवर श्री. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा विशेष प्रभाव होता.
सन १९०६ साली कोलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात राष्ट्रीय आंदोलनाचा चतु:सूत्री कार्यक्रम आखला.
राष्ट्रीय शिक्षण हे त्यातीलच एक सूत्र. विजापूरकरांनी या चतु:सूत्री तील राष्ट्रीय शिक्षण हे सूत्र घेऊन राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा सुरू करण्याचे ठरविले. १ जून १९०६ रोजी कोल्हापूर येथे समर्थ विद्यालय सुरू झाले .या शाळेला सर्व श्री ज.स. करंदीकर वामन मल्हार जोशी, नरहर बाळकृष्ण जोशी असे अनेक थोर शिक्षक लाभले.
१९०७ मध्ये श्रावण महिन्यात कोल्हापूरात प्लेगची साथ पसरली .त्यामुळे समर्थ विद्यालय मिरजेला कृष्णाकाठी एका वाड्यात सुरू झाले. पुढे महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन झाली .संस्थापक मंडळीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ,डॉक्टर नानासाहेब देशमुख, दाजी आबाजी खरे ,रा ब चिंतामणराव वैद्य व प्रोफेसर गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांची नावे होती .
कोल्हापूरच्या श्री आपटे यांची तळेगाव दाभाडे येथील स्टेशन जवळील ६४ एकर जमीन या संस्थेला मिळाली. आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर नोव्हेंबर १९०७ मध्ये समर्थ विद्यालय स्वतःच्या जागेत तळेगाव दाभाडे या निसर्गरम्य व ऐतिहासिक भूमीत सुरू झाले.शाळेसाठी निधी गोळा करण्यासाठी अण्णासाहेब विजापूरकर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतभर दौरे केले. लोकांच्या निधीतून सुरुवातीला कापडी पाल यांच्या रूपात असणारी शाळा दगडी इमारतीत साकार झाली. समर्थ विद्यालय ही वस्तीगृह युक्त शाळा होती.विजापूरकरांच्या अनेक पद्द्यांपैकी “निजेले व्हा जागे!”
वस्तीगृहातील शिस्त स्वावलंबन सामुदायिक कामे आणि गुरू-शिष्य मधील प्रेम या अनेक गुणांनी विद्यार्थ्यांचे शिर सुधारते असा विजापूरकरांचा विचार होता. शाळा सकाळी तीन तास व दुपारी तीन तास असे सकाळी मानण्याचे शिक्षण व दुपारी औद्योगिक शिक्षण मिळायचे. सर्व विषयांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची निर्मिती गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी स्वतः केलेली होती. पुस्तकी ज्ञानाबरोबरच बलोपासनेस अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान होते.
राष्ट्रीय शिक्षणातील महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षक. भावी पिढीच्या कल्याणाची जबाबदारी शिक्षकांवर. शिक्षकांची वागणूक पोशाख बोलणे चालणे इत्यादी गोष्टींचा विद्यार्थ्यांवर परिणाम होतो हे लक्षात घेऊन त्यांनी शिक्षक जमवून शिक्षणाचे कार्य विजापूरकरांनी सुरू केले. वि.का. राजवाडे सारखे थोर इतिहासकार समर्थ विद्यालयाला शिक्षक म्हणुन लाभले.
राष्ट्रीय शिक्षणाची शाळा म्हणून समर्थ विद्यालयाने आपला एक आदर्श सर्वांसमोर ठेवला.शाळा व्यवस्थित चालली होती .परंतु विश्ववृत्त या अंकातील पंडित सातवळेकर यांच्या वैदिक प्रार्थनांची तेजस्विता या लेखामुळे इंग्रजांचा रोष ओढवला गेला. आणि अण्णासाहेब विजापूरकर यांना ब्रिटिश सरकारने अटक केली.
ब्रिटिश विरोधी कारवाया करणारी शाळा म्हणून इंग्रजांनी १९१० मध्ये समर्थ विद्यालया ला टाळे ठोकले. सन १९१२ नंतर विजापूरकरांनी शाळा पुन्हा चालू करण्यासाठी अथक प्रयत्न केले .अखेर १९१८ मध्ये ही शाळा पुन्हा सुरू झाली. पण तिचे नाव त्यावेळेस बदलले गेले .संस्थेचे नाव नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ असे झाले .तर शाळेचे नाव नवीन समर्थ विद्यालय असे झाले. शाळेमध्ये संपूर्ण भारतातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी एक केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता बलोपासना सूतकताई ,शेती ,विणकाम ,सुतारकाम असे व्यवसायाभिमुख शिक्षण समर्थ विद्यालयातून दिले जायचे.
तत्कालीन परिस्थितीमध्ये आदरणीय महात्मा गांधी,सुभाषचंद्रजीआ बोस यांनी समर्थ विद्यालयास वारंवार भेटी देऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांना देशप्रेमाचे धडे दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे असंख्य पुत्र नवीन समर्थ विद्यालय आणि भारत भूमीला दिले. त्यातीलच एक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे नविन समर्थ विद्यालया च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी. त्यांच्या नावावरूनच पुढे समर्थ विद्यालयाच्या परिसरात विष्णुपुरी असे नाव देण्यात आले.
विजापूरकरांचे जीवन स्वप्न पूर्ण झाले. जीवनाच्या अंतापर्यंत विजापूरकरांनी राष्ट्रीय शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले .त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहावसन ही त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे नवीन समर्थ विद्यालयात झाले .तो दिवस होता १ ऑगस्ट १९२६ आषाढ वद्य ९शके १८४८ राष्ट्रीय शिक्षणाचा श्रीगणेशा नवीन समर्थ विद्यालय याच्या रूपाने करणारा सूर्य अस्तास गेला .पण आजही त्यांचे कार्य विचार तिच्यावर सुवर्ण तेजाने लखलखत आहे .आज नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाची एकूण अठरा शैक्षणिक दालने कार्यरत आहे. शिक्षणक्षेत्रात ध्रुवतारा प्रमाणे आपले अढळ व सर्वोच्च स्थान आपल्या गुणवत्तेच्या जोरावर टिकवून आहे. शेतकरी कष्टकरी यांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ अग्रेसर असते .संस्थेचे सन्माननीय माजी अध्यक्ष माजी आमदार माननीय कृष्णराव भेगडे साहेब यांचे मार्गदर्शन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे साहेब यांचे कर्तृत्व शील नेतृत्व आणि सन्माननीय सचिव संतोष खांडगे साहेब यांचे उपक्रमशील नेतृत्व निश्चितच संस्थेच्या कार्यास यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचणारी आहे .
आज दिनांक २ ऑगस्ट रोजी गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या जीवन पटास आपणा समोर मांडताना निश्चितच आम्ही सर्व शिक्षक स्वतःला भाग्यवान समजतो .गुरुवर्य अण्णा साहेबांची कर्मभूमी असणाऱ्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यालयात अध्यापना सारखी पवित्र कार्य करण्याची संधी आम्हास प्राप्त झाली.हे आमचे परमभाग्य म्हणावे लागेल. गुरुवर्य अण्णासाहेब तथा विष्णु गोविंद विजापूरकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
( शब्दांकन : सौ. प्रभा भारत काळे
अध्यापिका- नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!